कराड :अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिला फूस लावून पळवून नेणाऱ्या आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमासह, त्यांना लॉजमध्ये रूम उपलब्ध करून देणाऱ्या लॉज मालकास कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे. आशुतोष चंद्रकांत कुंभार (वय २१, रा. कालगाव, ता. कराड) असे अत्याचार करणाऱ्या संशयिताचे नाव असून, शमशुद्दीन रसुल नदाफ (वय ६२, रा. शनिवार पेठ, कराड) असे अटकेत असलेल्या लॉज मालकाचे नाव आहे. ओगलेवाडी येथील 'एस. के. रॉयल पॅलेस' या लॉजवर ही कारवाई करण्यात आली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, साधारण आठ दिवसांपूर्वी कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून डीवायएसपी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि सीडीआरच्या आधारे पोलिसांनी शोध घेत सातारा येथून संबंधित अल्पवयीन मुलीस सुखरूप ताब्यात घेतले.
मुलीकडे अधिक चौकशी केली असता, संशयित अशुतोष कुंभार याने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे आणि ओगलेवाडी येथील लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले. तपासादरम्यान अल्पवयीन मुलगी असल्याचे माहित असतानाही केवळ नफ्यासाठी रूम उपलब्ध करून देणाऱ्या लॉज मालकाचाही गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांनी लॉज मालक शमशुद्दीन नदाफ याला तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक रेखा देशपांडे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईमुळे अवैध प्रकारांना थारा देणाऱ्या लॉज चालकांचे धाबे दणाणले आहेत.