सातारा : बोरगाव येथे घरासाठी सर्व्हिस वायर घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून वकिलासह त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना 11 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज गणपती लोखंडे (वय 40, व्यवसाय वकील, रा. बोरगाव, ता. जि. सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, गावातील इलेक्ट्रिक पोलजवळ तसेच फिर्यादीच्या घरात आरोपी सुनील विठ्ठल बनकर, किशोर सुनील बनकर, सुखदा सुनील बनकर आणि रोहिणी सुनील बनकर (सर्व रा. बोरगाव, ता. सातारा) यांनी येऊन, तू येथून सर्व्हिस वायर घेऊन जायची नाहीस, असे म्हणत फिर्यादीसोबत वाद घातला.
यानंतर आरोपींनी मनोज लोखंडे यांना हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच आरोपी रोहिणी बनकर हिने फिर्यादीची पत्नी मंजुश्री मनोज लोखंडे यांच्या कानाखाली मारून त्यांना ढकलून दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार म्हेत्रे करीत आहेत.