पुणे : राज्यात आजपासून पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर २१ रोजी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला असून भारतीय हवामान विभागाने हा इशारा दिला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १९ आणि २० एप्रिल रोजी राज्यातील काही भागांत हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, २१ रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजा चमकत असताना मोकळ्या जागेत न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, तसेच झाडांखाली उभे राहणे टाळावे, असेही सूचित करण्यात आले आहे. दरम्यान, या पावसामुळे वाढत्या तापमानापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असली तरी आर्द्रतेमुळे उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.