अब्दुल इनाम सय्यद रा. शाहूनगर गोडोली सातारा (बुरखाधारी) आणि आफताब सलीम शेख (गाड्यांची तोडफोड करण्यामध्ये सहभागी) रा. मंगळवार पेठ, सातारा अशी जेरबंद करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तसेच त्यांच्या अन्य एका साथीदाराचा शोध सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूनगर, गोडोली हद्दीमध्ये मंगलमूर्ती किराणा स्टोअर्स नावाचे दुकान असून दि. 9 मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका मोटरसायकल वरून दोन व्यक्ती तिथे आले. त्यापैकी एकाने काळा बुरखा घातला होता तर दुसरा व्यक्ती हा काही अंतरावर मोटरसायकलवर बसून होता. बुरखा घातलेल्या व्यक्तीने दुकानाचे मालक असलेल्या महिलेशी किरकोळ किराणामालाची विचारपूस करत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून मोटरसायकल वरून पळ काढला होता. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तसेच दि. एक एप्रिल रोजी सत्यम नगर, सातारा येथे दोन युवकांनी धारदार हत्यारांनी दहशत माजवून दोन चार चाकी गाड्यांच्या काचा फोडून त्यातील मौल्यवान ऐवज चोरी केला होता. या युवकांना पकडण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक शोध घेत होते. या दोन्ही गुन्ह्याचा समांतर तपास यावेळी सुरू होता.
मंगळसूत्र बाबतची जबरी चोरी ही बुरखाधारी महिलेने केल्याचे फिर्यादींनी सांगितले होते. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता बुरखादारी ही महिला नसून तिच्या हालचालीवरून तो पुरुष असल्याची शंका निर्माण झाली होती. या गुन्ह्याचा प्रकार हा नवीन पद्धतीचा असल्याने पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी करून देखील उपयुक्त माहिती प्राप्त होत नव्हती. तसेच दोन्ही गुन्ह्यांच्या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींच्या वर्णनावरून गोपनीय माहिती प्राप्त केली होती.
हा गुन्हा करणारे युवक हे सुपा तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी पळून गेल्या बाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती देवी पथकाने तेथे जाऊन स्थानिक लोकांकडून माहिती प्राप्त करून संबंधितांसाठी सापळा लावला होता संबंधित आरोपी हे चौफुला रोडने मोटरसायकल वरून पळून जात असताना पोलिसांनी त्यांना चार चाकी वाहन आडवे लावल्याने त्यांनी दुचाकी तेथेच टाकून पळून जात असताना पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी करत असताना प्रथम ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. परंतु पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्वक कसोशीने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यातील एकाने अन्य एका साथीदारासोबत एका महिलेचा बुरखा घालून शाहूनगर परिसरातील एका महिलेचे गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने चोरल्याची कबुली दिली व वाहनांची तोडफोडही अन्य एका साथीदारासोबत केल्याचे सांगितले. त्याच्या अन्य साथीदारास देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकल, मोबाईल, धारदार हत्यारे, बुरखा, सोने असा एकूण दोन लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील बुरखादारी आरोपीची गोपनीय माहिती प्राप्त करून त्याला ताब्यात घेतल्याने स्थानिक नागरिक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के आणि डीबी पथकाचे अभिनंदन केले आहे. संबंधितांनी अशाच प्रकारे आणखी कोठे गुन्हे केले आहेत का? याबाबत तपास सुरू आहे. तसेच आरोपींच्या अन्य साथीदार व आरोपींना मदत करणाऱ्या त्यांच्या साथीदारांचा पोलीस तपास करीत आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, अनिल जायपत्रे, पोलीस हवालदार निलेश यादव, सुजित भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल सुशांत कदम, तुषार भोसले, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम तसेच सायबर विभागाने सहभाग घेतला.