कासचा पर्यटन हंगाम एक सप्टेंबरपासून सुरू होणार; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या कडक सूचना, कास परिसरात आढावा बैठक

by Team Satara Today | published on : 20 August 2026


सातारा : कास पठारावरील यंदाचा पर्यटन हंगाम एक सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मंगळवारी पूर्वतयारीची आढावा बैठक कास परिसरात घेतली. यावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकेरी मार्ग आणि घाटांमध्ये नो पार्किंग झोनची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

पर्यटकांची दैनंदिन ऑनलाइन व ऑफलाइन मर्यादा ठेवली जाणार आहे. वाहनधारकांनी घाटाई मार्गे जाणे व कास पठारमार्गे परत येणे असा एकेरी मार्ग असेल. हंगाम काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कास पठारावरील राजमार्ग येथे 'नो पार्किंग झोन' घोषित केला जाईल. नो पार्किंग झोनमध्ये पार्क करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाची क्रेन व पोलिस तैनात केले असतील. हुल्लडबाज पर्यटकांना आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवली जाणार आहे. कासकडे जाणारे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

पर्यटकांसाठी ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत. वेबसाइटवरही बुकिंग, वाहतूक व्यवस्था, हिरकणी कक्ष, पार्किंग, स्वच्छतागृह यांची माहिती द्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पठारावर स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. बैठकीसाठी उपवनसंरक्षक अमोल सातपुते, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, आदी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जलसंधारणासाठी राजवाडा ते शिवतीर्थ वॉकेथॉनचे २१ ऑगस्ट रोजी आयोजन; नागरिकांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी संतोष पाटील

संबंधित बातम्या