स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीत (सातारा) : दलित समाजाकडे अन्नाचे षड्रस कधीच उपलब्ध नव्हतेच. जे मिळेल ते खायचे हा एकमेव रस दलित अन्न संस्कृतीमध्ये होता, त्यामुळे ही संस्कृती दलित समाजावर लादलेली आहे, असा सूर शाहू पाटोळे लिखित 'अन्न हे अपूर्णब्रह्म' या पुस्तकावर आयोजित परिचर्चेत उमटला.
९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज (दि. ४) मंडप क्रमांक १ येथे या परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या परिचर्चेत ज्येष्ठ लेखक शाहू पाटोळे यांच्यासह ज्येष्ठ दलित साहित्यिक मिलिंद कसबे, पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर करणारे भूषण कोरगांवकर सहभागी झाले होते. राहुल कोसंबी यांनी त्यांच्याच्या संवाद साधला.
पुस्तकाविषयी बोलताना पाटोळे म्हणाले, दलित लेखकांनी दलित खाद्य संस्कृतीचा आपल्या साहित्यात उल्लेख केला आहे, पण त्याविषयी सविस्तर लिहिलेले नाही. त्यामुळे मला हे पुस्तक लिहावे लागले. या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर झाल्यानंतर त्याची दखल इंग्रजी साहित्य विश्वात घेतली गेली. त्यानंतर मराठी साहित्य विश्वाचे लक्ष या पुस्तकाकडे गेले, असे त्यांनी खेदाने सांगितले. दलित समाजाला जे मिळाले ते खावे लागले, त्यामुळे आमच्यासाठी अन्न हे अपूर्णब्रह्मच राहिले. आमच्यावर ही खाद्य संस्कृती जाणीवपूर्वक लादली गेली आहे. आम्हाला आमच्या अन्नाची लाज वाटावी, आम्ही मांसाहारी आहोत; त्याविषयी न्यूनगंड वाटावा, असे वातावरण जातीय संस्कृतीने निर्माण केले आहे.
तुमचे पुस्तक कुठल्या जातीविरोधी आहे का या प्रश्नाला उत्तर देताना पाटोळे म्हणाले, माझे पुस्तक कोणत्याही वैदिक परंपरेचा विरोध करत नाही आणि मांसाहाराचा प्रचार देखील करत नाही. माझ्या दृष्टीने दलित समाजाची बाजूदेखील कुणीतरी मांडावी या दृष्टीने केलेले हे एक दस्तावेजीकरण आहे.
मिलिंद कसबे म्हणाले, भारतातील वैदिक परंपरेने समाजावर शाकाहार हे शुद्ध अन्न आहे, असे विचार लादून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकारण केले. ही खाद्य संस्कृती नसून हुकूमशाही आहे. पुस्तकाविषयी बोलताना ते म्हणाले, जो उच्चवर्णीय जो शुद्ध भाषा बोलतो; त्याचे अन्नही शुद्ध आणि जे निम्नवर्गीय किंवा दलित आहेत त्यांची भाषा आणि अन्नही अशुध्द असे वातावरण तयार केले जात आहे, हे पुस्तक या गोष्टीचे चिकित्सा करते. हे पुस्तक फक्त वाङ्मय नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चिकित्सा करणारे आहे.