पाटण : कडक उन्हाच्या तीव्रतेपासून सुटका करून घेण्यासाठी कोयना धरण परिसरातील नदीपात्रात पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करण दाजी कदम (वय १५) आणि आर्यन अनिल कदम (वय १६, रा. गाडखोप, ता. पाटण) अशी मृत पावलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गाडखोप गावावर आणि पाटण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. याच उन्हापासून काहीसा दिलासा मिळावा म्हणून करण कदम आणि आर्यन कदम हे दोन्ही मित्र कोयना नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, नदीतील पाण्याच्या खोलीचा अचूक अंदाज न आल्यामुळे हे दोघेही पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना परिसरात समजताच ग्रामस्थांनी नदीकाठी मोठी गर्दी केली होती.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. ओलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने नदीपात्रात युद्धपातळीवर शोधमोहीम राबवण्यात आली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश आले. दोन्ही उमलत्या वयाच्या शाळकरी मुलांचा असा अचानक अंत झाल्याने नातेवाईकांसह उपस्थित नागरिकांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.