पुसेगाव : पुणे येथील संस्कृती प्रकाशन आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची पुसेगांव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक, सामजिक आणि राजकीय कार्यकर्त्ते पुसेगाव, ता. खटावचे सुपुत्र कै. सतीशतात्या फडतरे कार्यगौरव पुरस्कार साहित्य, सहकार, बॅंकींग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबदल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार रविवार, दि. २० जुलै रोज़ी पुसेगाव येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कुलकर्णी यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्कृती प्रकाशनच्या प्रमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सौ. सुनीताराजे पवार यांनी दिली.
विनोद कुलकर्णी हे साहित्य, सहकार, बँकिंग, पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. साहित्य क्षेत्रात मसाप शाहूपुरी शाखेच्या वतीने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राज्यातील साहित्य क्षेत्रात नाव कमावलेले आहे. नुकतेच 12 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर साता-यात तब्बल 32 वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जनआंदोलन उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. सातारकरांची जिव्हाळ्याची बँक असलेल्या जनता सहकारी बँकेला त्यांनी दोनदा तोट्यातून बाहेर काढले आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात जनता सहकारी बँकेच्या इतिहासात प्रथमच शून्य एनपीए राखण्याची कामागिरी त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने केली आहे. पत्रकारिता क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना कै. सतीशतात्या फडतरे कार्यगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे वितरण पुसेगाव येथे रविवार दि. 20 जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. पुसेगाव येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख अतिथी म्हणून कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहेत.
मसाप, जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, नंदकुमार सावंत, मसाप पुणे कार्यवाह अॅड. प्रमोद आडकर, माधव राजगुरु, अंजली कुलकर्णी, मृणालिनी कानिटकर-जोशी, मसाप पुणे शहर प्रतिनिधी ज्योत्सना चांदगुडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यावेळी कै. फुलाबाई व आनंदराव बजाबा फडतरे स्मरणार्थ फुलानंद उत्कृष्ट पालक पुरस्कारही देण्यात येणार आहे. श्री सेवागिरी विद्यालय, हनुमानगिरी विद्यालयातील दहावीमध्ये प्रथम व व्दितीय येणा-या विद्याथर्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यात सौ.रुपाली व किशोर शिवाजी जगदाळे, सौ.शोभा व अनिल पोपटराव जगदाळे, सौ. विद्या व ज्ञानेश्वर भगतसिंग चव्हाण, सौ. रब्बना व नौशाद बनेखान मुल्ला यांचा समावेश आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्कृती परिवार, पुणे, मसाप, पुणे पुसेगाव शाखा, फडतरे कुटुंबिय यांनी केले आहे.