कोयना धरणात 51.21 टीएमसी पाणीसाठा ; महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' अजूनही निम्म्यावरच

by Team Satara Today | published on : 17 July 2026


कराड  : पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत अधूनमधून पाऊस सुरू असला, तरी कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आवश्यक असलेला जोरदार आणि सलग पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे राज्यासाठी जीवन वाहिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढत असला, तरी तो अद्याप निम्म्याच्या आसपासच आहे. 

शुक्रवार, दि.  १७ जुलै रोजी सकाळी आठ वाजता धरणाची पाणीपातळी २१११ फूट ८ इंच (६४३.६३६ मीटर) इतकी नोंदविण्यात आली. धरणातील एकूण पाणीसाठा ५३.९० टीएमसी (५१.२१ टक्के), तर उपयुक्त पाणीसाठा ४८.७८ टीएमसी (४८.७१ टक्के) इतका आहे. गेल्या २४ तासांत कोयना येथे २० मिमी, नवजा येथे १० मिमी आणि महाबळेश्वर येथे ९ मिमी पावसाची नोंद झाली.

मात्र, या पावसामुळे धरणात येणारा पाण्याचा ओघ अत्यल्प राहिला असून केवळ १,६९५ क्युसेक (०.१४ टीएमसी) इतकाच विसर्ग धरणात दाखल झाला आहे. धरणातून जलविद्युत केंद्र किंवा दरवाजांद्वारे कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.

यंदा जुलै महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला असला, तरी धरणातील साठा अपेक्षित वेगाने वाढताना दिसत नाही. सामान्यतः जुलैच्या अखेरीस आणि ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात कोयना खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्यास धरण झपाट्याने भरते. त्यामुळे हवामानातील बदल आणि पुढील आठवड्यातील पावसावरच धरण किती वेगाने भरेल, हे अवलंबून राहणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा बँकेच्या नोकरभरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवली; पात्र उमेदवारांना कागदपत्रे जमा करण्याची सूचना

संबंधित बातम्या