सातारा : बेकायदा गावठी कट्टा (पिस्टल) बाळगल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांना मोळाचा ओढा येथून अटक केली. संशयित दाेन्ही युवक भुईंज ता.वाई येथील असून सव्वा लाखाचे पिस्टल, दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.
रवि रविंद्र जाधव (वय २३), रेवणसिद्ध भिमाअण्णा पुजारी (वय २७ दोघे रा. भुईंज ता. वाई) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १३ एप्रिल रोजी मोटारसायकलवरील दोघांकडे पिस्टल असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. संशयित मोळाचा ओढा ते करंजे नाका या परिसरात असल्याची खात्री पोलिसांना झाली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करुन परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली. मोळाचा ओढा येथे दोघेजण पोलिसांना संशयितरीत्या दिसल्यानंतर त्यांनी थांबण्यास सांगितले. मात्र संशयितांनी पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना पकडले. संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे पिस्टल सापडले.
पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेवून त्यांच्याकडील ७५,००० रुपये किंमतीचे पिस्टल व ५०,००० रुपये किंमतीची दुचाकी असा एकुण १,२५,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी कुमार ढेरे, पोलिस सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.