राज्य शासनाकडून हुकूमशाही पद्धतीने प्रकल्प लादले जात आहेत; सातारा जिल्ह्यात वादळ उभं करणार - शशिकांत शिंदे यांचा इशारा

by Team Satara Today | published on : 16 November 2026


सातारा : राज्य शासनाकडून हुकूमशाही पद्धतीने प्रकल्प लादले जात आहेत. लोकांचाही उठाव नसल्याने असे चुकीचे प्रकल्प होतात. विरोध मोडून काढला जात आहे. शासन आंदोलन आणि विरोधालाही जुमानत नाही. मीही सातारा जिल्ह्यात वादळ उभे करून निकालही देणार आहे, असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिला. तसेच यावेळी त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीप्रमाणे, एकत्र निर्णय घ्यावा. राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेचेच जिल्हा बॅंकेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होतील, असा सल्लाही दोन्ही पक्षनेत्यांना दिला.
येथील राष्ट्रवादी भवनमध्ये, आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष शिंदे बोलत होते. यावेळी राज्य सरचिटणीस नरेश देसाई, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, युवक जिल्हाध्यक्ष समीर घाटगे, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रवीण धस्के आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एका धरणावरील प्रकल्पाच्या विरोधात आंदोलने सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. ते म्हणाले, विजेची मागणी वाढतेय हे खरे आहे. कारण, राज्यात विजेचे शॉर्टेज आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईतही भारनियमन करावे लागेल. पण, एखादा प्रकल्प करताना लोकांना विश्वासात घ्यायला हवे.
प्रकल्प लादला तर लोकांचा विरोध होतो. कर्जतमधील प्रकल्पाला असाच विरोध झाला. तेव्हा देश ढवळून निघाला. आता पाटण तालुक्यात प्रकल्प सुरू आहे. तेथे शासन दबावाचा अवलंब करत आहे. लोकांनी उठाव केला तरच असे प्रकल्प बंद पडतील. लोकांचा उठाव नसल्यानेच ते दांडगाईने सुरू असतात.
दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पाच हजारांची मदत किती शेतकऱ्यांना मिळाली यावरुनही राज्य शासनावर शिंदे यांनी टीकास्त्र सोडले. तर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत बंडखोरी झाली. योग्य उमेदवार दिले असते तर निवडणूक ५-० अशी आघाडीने जिंकली असती, असा दावाही त्यांनी केला. तसेच सत्ताधाऱ्यांनी त्या निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर केला असा आरोपही केला.
आता निर्णय हायकमांड घेतात....
पत्रकार परिषदेदरम्यान प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भाजपवरही अप्रत्यक्षरित्या तोंडसुख घेतले. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडणुकीवरुन त्यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. आमच्या काळात जिल्ह्यातील नेते निर्णय घेत होते. पण, आता निर्णय हायकमांड घेतात, असे त्यांनी एकप्रकारे भाजपला सुनावले. जिल्हा बॅंक अध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिंदेसेनेने एकत्र निर्णय घ्यावा, असा सल्ला देण्यासह शिंदे विसरले नाहीत.
राष्ट्रवादीचे विलीनीकरण का होत नाही शोधणे गरजेचे...
राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण कधी होणार या प्रश्नावर शिंदे यांनी मी विलीनीकरणाच्या चर्चा पाहत आहे. पण, त्यातून तसे काही निघत नाही. विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही हे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. तरीही दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण पूर्ण का होत नाही, याचेही कारण शोधणे गरजेचे आहे, असा कोड्यात टाकणारा सवालही शिंदे यांनी केला.
अजितदादांचा घातपात झाला सांगण्याची शासनाची गरज...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला ९ महिने झाले आहेत. त्यामागील कारण काय हे कधी समोर येणार. तो मफलरवाला नेता कोण ? असा प्रश्नही पत्रकारांनी उपस्थित केला. यावर प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनामागील सत्य समोर यावे हे महत्त्वाचे आहे. आज ९ महिन्यानंतरही सीआयडीचा अहवाल समोर आलेला नाही. आम्हाला शंका आहे की यामागे घातपात आहे. पण, हे सांगण्याची राज्य आणि केंद्र शासनाला गरज आहे, असे सांगून दोन्ही शासनाकडे बोट दाखवले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागल्याने महामार्गावर वाहनांचा महापूर; वाहनांच्या एक ते दोन किलोमीटरपर्यंत रांगा

संबंधित बातम्या