जकातवाडीत भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात ११ जण जखमी, जखमींमध्ये दोन लहान मुलींचा समावेश, काहींना गंभीर दुखापती

by Team Satara Today | published on : 12 April 2026


सातारा : सातारा तालुक्यातील जकातवाडी परिसरात रविवारी भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यामुळे एकाच दिवशी ११ जण जखमी झाल्याची गंभीर घटना घडली.  जखमींमध्ये दोन लहान मुलींचा समावेश असून काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. दुपारच्या सुमारास जकातवाडी ते साठेनगर या परिसरात हा प्रकार घडला. 

संबंधित कुत्रा आक्रमक बनून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर अचानक झडप घालत होता. त्यामुळे काही वेळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या डोक्याला, हातांना तसेच चेहऱ्याजवळ जखमा झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. घटनेनंतर जखमींना तातडीने क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

सर्वांवर  उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठिकठिकाणी साचणाऱ्या कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करत संबंधित भागात पथक पाठवले. कुत्र्यांना पकडणे आणि निर्बीजीकरणाची मोहीम राबविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनीही रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. विशेष म्हणजे, हल्ल्यानंतर संबंधित कुत्रा मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर (खेड) येथील शासकीय जागेवरील दर्गा हटवा; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
पुढील बातमी
वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात अतिक्रमणांविरोधात जोरदार कारवाई; आंबेडकर जयंतीपूर्वी शाहू चौक परिसर मोकळा

संबंधित बातम्या