सातारा : पालघर शहरामध्ये काही महिन्यांपूर्वी (१२ जून २०२६ रोजी) घडलेल्या अत्यंत खळबळजनक आणि भीषण हल्ल्यातील पीडित तरुणीबाबत एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या 27 वर्षीय पुळकोटी, ता. माण येथील स्नेहल सावंत हिच्या संघर्षांचा अखेर अंत झाला. अडीच महिने सुरु असलेली तिची मृत्यूशी झुंज संपली. साताऱ्यातील रुग्णालयात तिचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त तिच्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची केली आहे.
पुळकोटी येथील शेतकरी कुटुंबातील स्नेहल सावंत हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अंत्यत परिश्रमातून एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यामुळे तिचा शासकीय सेवेत प्रवेश झाला होता. सारे गाव आणि कुटुंबीय तिच्या यशामुळे आनंदित होते. कौतुकाचा वर्षाव झेलत स्नेहल पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून रजू झाली होती. आता आईवडिलांना सुखात ठेवण्याची स्वप्ने पहात नव्या नोकरीत ती काम करत होती.
मात्र, नियतीच्या मनात वेगळेच होते. शासकीय सेवेत रुजू होऊन अवघे सात महिने उलटलेले असताना पालघर येथे रस्त्याने जात असताना अमोल मुळे या आरोपीने त्यांच्यावर अत्यंत अमानुषपणे कोयत्याने हल्ला चढवला होता. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. या घटनेने सारे गाव व कुटुंबीय हादरुन गेले होते. एका हुशार मुलीवर ओढावलेल्या या प्रसंगाने सगळेजण हळहळत होते.
या भीषण हल्ल्यानंतर स्नेहल यांच्यावर सुरुवातीला पालघर आणि पुण्यातील रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले, यानंतर सातार्यातील एका रुग्णालयात गेले अडीच महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील असलेल्या स्नेहल यांच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुंबाने आपली शेतजमीन विकून तब्बल 35 लाख रुपयांचा खर्च केला होता. मात्र अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
स्नेहल यांच्या निधनामुळे सावंत कुटुंबातील मुख्य आधार हिरावला गेल्याने पुळकोटी गावावर आणि संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
खटला तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा
या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे आक्रमक मागणी केली आहे. स्नेहल यांच्यावर झालेला हा हल्ला अतिशय गंभीर स्वरूपाचा असून, हा खटला तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पुढील सहा महिन्यांच्या आत दोषी आरोपीला फाशीचीच कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.