कृष्णा पुलावर महिला पोलिस हवालदाराच्या प्रसंगावधानामुळे मायलेकाचे प्राण वाचले; तृप्ती वीर यांच्या धाडसाचे, सतर्कतेचे सर्वत्र कौतुक

by Team Satara Today | published on : 12 July 2026


सातारा : सुट्टीच्या दिवशीही कर्तव्याची जाणीव ठेवत एका महिला पोलिस हवालदाराने दाखवलेल्या तत्परतेमुळे कृष्णा पुलावर एका महिलेसह तिच्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचे प्राण वाचले आहेत. महिला पोलिस हवालदार तृप्ती वीर यांनी दाखवलेल्या या धाडसाचे व सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सातारा शहरातील कृष्णा पुलावर एक महिला तिच्या नऊ महिन्यांच्या बाळासह संशयास्पद आणि अत्यंत चिंताजनक परिस्थितीत उभी असल्याचे दिसून आले. याच वेळी तेथून जात असलेल्या आणि साप्ताहिक सुट्टीवर असलेल्या महिला पोलिस हवालदार तृप्ती वीर यांनी परिस्थितीचे गांभीर्य त्वरित ओळखले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेच्या दिशेने धाव घेत योग्य वेळी मध्यस्थी केली. त्यांच्या या तातडीच्या हस्तक्षेपामुळे संभाव्य अनर्थ टळला असून मायलेकाचे प्राण सुरक्षित राहिले.

​या घटनेनंतर संबंधित महिला आणि तिच्या बालकाला तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवून पुढील आवश्यक कायदेशीर कारवाई व मदतीसाठी संबंधित यंत्रणेला माहिती देण्यात आली. कर्तव्यावर नसतानाही दाखवलेली सामाजिक जबाबदारी, तत्परता आणि संवेदनशीलतेमुळे एक मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. तृप्ती वीर यांच्या या कामगिरीमुळे सातारा पोलिस दलाची संवेदनशील आणि कर्तव्यनिष्ठ प्रतिमा पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सैराट’ फेम अभिनेता सल्याची रुग्णालयाकडून लूट; इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहिला अन् तुकाराम मुंढेंनी दिले सोलापुरातील रूग्णालयाच्या चौकशीचे आदेश

संबंधित बातम्या