सातारा : माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या आर्थिक व्यवहारांची तसेच त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची सक्षम यंत्रणांमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अंगापूर (ता. जि. सातारा) येथील वैभव महादेव गवळी यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात गवळी यांनी म्हटले आहे की, मोरे यांनी विविध शासकीय विभागांशी संबंधित माहिती अधिकाराचे अर्ज दाखल केले असून अनेक प्रकरणांमध्ये आंदोलनेही केली आहेत. या प्रकरणांपैकी काहींचा निकाल अंतिम टप्प्यापर्यंत न जाता ते अन्य मार्गाने निकाली निघाल्याचा संशय असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर मोरे यांच्या उत्पन्नाचे स्रोत, संपत्ती आणि आर्थिक व्यवहारांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी), आयकर विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच अन्य संबंधित यंत्रणांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच, संबंधित सर्व प्रकरणांची निष्पक्ष फेरचौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि चौकशीत कोणतीही अनियमितता अथवा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही गवळी यांनी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.