नो हॉकर्स झोनमधील विक्रेत्यांना पर्यायी जागा

by Team Satara Today | published on : 23 August 2025


सातारा : सातारा पालिकेने राजवाडा-मोती चौक ते शनिवार चौक यादरम्यान केलेल्या नो हॉकर्स झोनमधील 26 विक्रेत्यांना जुनी भाजी मंडई परिसरात पर्यायी जागा देण्यात येणार आहे. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या सभागृहात काढलेल्या लकी ड्रॉमध्ये या विक्रेत्यांना जागेची लॉटरी लागली.

वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याने सातारा पालिकेने सदाशिव पेठेत नो हॉकर्स झोन जाहीर केला. त्यामुळे राजवाडा-माती चौक ते शनिवार चौक (पाचशे एक पाटी) यादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा बसणार्‍या विक्रेत्यांच्या व्यवसायाचा प्रश्न निर्माण झाला होता. गणशोत्सव सुरू होत असल्याने व्यवसायाचे नुकसान टाळण्यासाठी पर्याय काढावा, अशी मागणी विक्रेत्यांनी नगरपालिकेकडे केली होती. त्यानुसार मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या मार्गदर्शनाखाली अमितक्रमण हटाव विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांनी सातारा पालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संबंधित विक्रेत्यांसाठी चिट्ठी काढून लकी ड्रॉ काढला. यावेळी हॉकर्स संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते. या लकी ड्रॉमध्ये नगरपालिकेने केलेल्या बायोमेट्रिक सर्व्हे नोंद असलेल्या 26 विक्रेत्यांना पर्यायी जागांचे वाटप करण्यात आले. सदाशिव पेठेतील जुन्या भाजी मंडईत आरएमसी करून 63 गाळे निर्माण करण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरात वाहतूक कोंडी व गर्दीचा प्रश्न गंभीर होत होता. विशेषत: राजवाडा ते मोती चौक ते शनिवार चौक या परिसरात विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. यावर तोडगा म्हणून नगरपालिकेने राजवाडा-मोती चौक ते शनिवार चौक हा मार्ग नो हॉकर्स झोन म्हणून घोषित केला. परंतु, विक्रेत्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने नगरपालिकेने त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे. नगरपालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होणयस मदत होणार आहे. तसेच विक्रेत्यांनाही स्थिर जागा मिळाल्याने त्यांच्या व्यवसायास स्थिरता मिळणार आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तातडीच्या उपचारामुळे दीड वर्षाच्या अनुजला मिळाले जीवदान
पुढील बातमी
जावलीतील जवानाचे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन

संबंधित बातम्या