बालकांच्या अश्लील व्हिडिओंच्या प्रसारणप्रकरणी कराडमधील युवकावर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 25 October 2026


कराड  : बालकांशी संबंधित अश्लील डिजिटल सामग्री ऑनलाइन प्रसारित केल्याप्रकरणी कराड परिसरातील एका युवकाविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय सायबर यंत्रणेकडून प्राप्त अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल धीरज कोरडे यांनी तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून (एनसीआरबी) प्राप्त झालेल्या सायबर टिपलाइन अहवालांची पडताळणी करताना हा प्रकार समोर आला. संबंधित अहवाल आणि डिजिटल व्हिडिओंची २४ सप्टेंबर रोजी पाहणी करण्यात आली. त्यावेळी संबंधित डिजिटल सामग्री अपलोड झालेल्या ठिकाणाच्या तांत्रिक नोंदींमध्ये सातारा जिल्ह्यातील लोकेशन आढळून आले.
यानंतर संबंधित मोबाईल क्रमांकाचा तांत्रिक तपशील मिळविण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत पत्रव्यवहार करण्यात आला. प्राप्त माहितीच्या आधारे संबंधित सोशल मीडिया खात्याशी निगडित संशयित युवकाची ओळख पटविण्यात आली. या खात्यावरून १२ एप्रिल २०२५ रोजी बालकांशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याचे तसेच ते संकलित केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.
एनसीआरबीचा अहवाल आणि उपलब्ध डिजिटल तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कराड शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गंभीर तक्रारींच्या पार्श्वभूमीवर वाईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव निलंबित
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात २७ ऑक्टोबरला राष्ट्रीय जंतनाशक मोहीम; ६ लाख ३१ हजार बालकांना मिळणार डोस

संबंधित बातम्या