दरवर्षी शिवसाहित्य संमेलन भरवणार

ना. शिवेंद्रसिंहराजे; गोष्ट इथे संपत नाही ने घडवली ऐतिहासिक सफर

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास, त्यांचे सरदार, शिलेदार यांचा आपल्याला माहित नसलेला इतिहास समाजापुढे आला पाहिजे. खरा इतिहास प्रत्येकाला समजला पाहिजे या उद्देशाने आपण एक दिवसाचे शिवसाहित्य संमेलन सातार्‍यात भरवले. केवळ आजच नव्हे तर, छत्रपतींच्या इतिहासाला सातत्याने उजाळा मिळण्यासाठी शिवसाहित्य संमेलन दरवर्षी घेतले जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ’गोष्ट इथे संपत नाहीया कार्यक्रमाने सातारकरांना ऐतिहासिक सफर घडवून शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडला.

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सव समिती राजधानी सातारा यांच्यावतीने तीन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी देशातील पहिले शिवसाहित्यसंमेलन सातारा येथील शाहू कलामंदिर येथे उत्साहात झाले. या संमेलनाच्या समारोपप्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, आयसीआर नवी दिल्लीचे अध्यक्ष खा. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान पुणेचे विश्वस्त विनीत कुबेर, माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, ऍड. नितीन शिंगटे, अमित कुलकर्णी, दत्ताजी थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

एकदिवसीय शिवसाहित्य संमेलनात पहिल्या सत्रात सौरभ कर्डे यांनी छत्रपती शिवराय व स्वराज्याचे शिलेदार’, शैलेश वरखडे यांनी थोरली मसलतयावर व्याख्यान देऊन इतिहासाला उजळणी दिली. दुसर्‍या सत्रात कु. पियुषा भोसले व सहकलाकारांनी शिवशाहिरांचे पोवाडेहा कर्यक्रम सादर करून इतिहासप्रेमी व उपस्थितांची मने जिंकली. तिसर्‍या सत्रात मोहन शेटे यांनी छत्रपतींची युद्धनीतीआणि प्रा. प्र. के. घाणेकर यांनी छत्रपतींचे दुर्गवैभवयावर सविस्तर माहिती देत शिवकालीन इतिहास उलगडला. संमलेनाच्या समारोप्रसंगी अफजलखान वध (1645 ते 1659) ’गोष्ट इथे संपत नाहीया सारंग मांडके व सारंग भोईरकर यांच्या कार्यक्रमाने अफजलख स्वराज्यावर चालून आल्यापासून ते त्याचा वध या कालावधीत व वधानंतरच्या कालावधीत घडलेला इतंभूत इतिहास श्रोत्यांसमोर उभा राहिला. संमेलनातील सर्वच कार्यक्रमांनी सातारकरांची मने जिंकली.

बुधवारी शाही मिरवणूक व महाआरती दरम्यान, शिवजयंती महोत्सवात बुधवार दि. 19 रोजी शिवजयंतीदिनी सातारा नगरीत ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिवप्रतिमेची ऐतिहासिक शाही मिरवणूक काढण्यात येणार आहे. गांधी मैदान, राजवाडा येथून सायंकाळी 5 वाजता मिरवणुकीला प्रारंभ होणार असून मिरवणुकीत केरळ येथील प्रसिद्ध वाद्य पथक, ढोलताशा पथक, तुतार्‍या, हलगी पथक यांच्यासह उंट, घोडे आणि विविध चित्ररथ सहभागी होणार आहेत. त्यांनंतर रात्री 9 वाजता शिवतीर्थ, पोवई नाका येथे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची महाआरती होणार आहे. यावेळी डोळे दिपवून टाकणारी आकर्षक फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे. यावेळी सर्व शिवप्रेमी आणि नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


मागील बातमी
जिल्ह्यात शिवजयंतीचा उत्सवी माहोल
पुढील बातमी
सर्कलवाडी येथे एआय (AI) तंत्राद्वारे डाळिंब लागवडीचा प्रयोग

संबंधित बातम्या