फलटण पालिकेत 'पती-राजां'च्या हस्तक्षेपाला चाप; मुख्याधिकारी निखिल जाधव यांचा कारवाईचा कडक इशारा

by Team Satara Today | published on : 17 September 2026


फलटण : फलटण नगरपालिकेच्या अधिकृत बैठका आणि कामकाजात महिला सदस्यांच्या पतींचा तसेच नातेवाईकांचा वाढता बेकायदेशीर हस्तक्षेप रोखण्यासाठी मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी प्रशासकीय चाबूक उगारला आहे. शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या आणि कर्मचाऱ्यांवर दबाव टाकणाऱ्या बाह्य व्यक्तींवर थेट कायदेशीर कारवाई करण्याचा कडक आदेश त्यांनी जारी केला आहे.
नगरपालिकेत निवडून आलेल्या महिला सदस्यांच्या नावाखाली त्यांचे पती, नातेवाईक अथवा तथाकथित प्रतिनिधी पालिका कार्यालयात दिवसभर ठाण मांडून बसणे, कर्मचाऱ्यांशी वाद घालणे, प्रशासनावर बेकायदेशीर दबाव आणणे आणि अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. या गैरप्रकारांची गंभीर दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी शासन परिपत्रकांचा हवाला देत कार्यालयीन आदेश (जा.क्र. फनप/१९३७/२०२६) जारी केला आहे. या आदेशानुसार, पालिकेच्या कोणत्याही अधिकृत बैठकीत अथवा प्रशासकीय कामकाजात महिला सदस्यांच्या पतींना, नातेवाईकांना किंवा अनधिकृत प्रतिनिधींना उपस्थित राहण्यास अथवा हस्तक्षेप करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
एवढेच नव्हे तर, कोणत्याही बाह्य व्यक्तीने कामकाजात दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्याची लेखी नोंद करून नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे अहवाल द्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. कायदेशीर अधिकार नसलेल्या व्यक्तींना कार्यालयीन गोपनीय माहिती पुरवणे किंवा त्यांच्या दबावाखाली काम करणे ही गंभीर शिस्तभंगाची बाब मानली जाईल, असा इशाराही पालिका कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या या धडक पावलामुळे पालिकेत अनाधिकृत हस्तक्षेप करणाऱ्या तथाकथित पुढाऱ्यांचे धाबे दणाणले असून या निर्णयाचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्यांत रोजगाराच्या संधी देणाऱ्या आस्थापनांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
जिल्हयात कार्यरत सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांत महिलांच्या लैंगिक छळापासुन संरक्षणासाठी तक्रार निवारण समिती आवश्यक

संबंधित बातम्या