सातारा : कोरेगाव तालुक्यात गुप्तपणे अल्पवयीन मुलीचा विवाह उरकण्याचा प्रयत्न सुरू असताना सातारा पोलिसांनी वेळेत धडक कारवाई करून हा प्रकार उघडकीस आणला. पोलीस, महिला व बाल विकास विभाग आणि चाईल्ड लाईनच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी पोहोचत नियोजित बालविवाह रोखला.
विश्वसनीय माहितीनंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत संबंधित ठिकाणी भेट दिली. चौकशीदरम्यान मुलगी कायदेशीर विवाह वयापेक्षा कमी असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी पालक व नातेवाईकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाईची स्पष्ट सूचना दिली. तसेच अल्पवयीन मुलींच्या विवाहामुळे शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक आयुष्यावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगत समुपदेशन करण्यात आले.
प्रशासनाच्या कठोर भूमिकेनंतर संबंधित कुटुंबीयांनी विवाह स्थगित करण्यास मान्यता दिली. त्यामुळे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह ऐनवेळी थांबवण्यात प्रशासनाला यश आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाचे API राजेश माने, पोलीस हवालदार मुनीर मुल्ला, महिला पोलीस क्रांती जाधव, भरोसा सेलच्या प्रियांका देशमुख, कोरेगाव पोलीस ठाण्याचे PSI जगदाळे, महिला पोलीस हवालदार पाचांगणे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय शिंदे, महिला व बाल विकास विभागाच्या सुजाता शिंदे, चाईल्ड लाईनचे वैभव इंगवले आदींनी सहभाग घेतला.
बालविवाहासारख्या प्रकारांची माहिती नागरिकांनी तत्काळ पोलीस किंवा चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.