सातारा : भारतीय जनता पार्टीचे सातार्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे जिल्ह्यात महायुतीची निर्विवाद सत्ता आल्यामुळे खर्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी आली आहे. युतीचा बालेकिल्ला शाबूत ठेवणे आणि महायुतीच्या आमदारांशी समन्वय ठेवून बालेकिल्ल्यावर नियंत्रण ठेवणे, अशा दुहेरी जबाबदारीचा रिमोट कंट्रोल उदयनराजे यांना आपल्या हातात ठेवावा लागणार आहे.
महायुतीच्या निर्विवाद सत्तेमुळे जिल्ह्यात प्रथमच उदयनराजे भोसले जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनले आहेत. यंदाची लोकसभा निवडणूक खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी अत्यंत संघर्षपूर्ण ठरली. संपूर्ण जिल्हा पिंजून काढत उदयनराजे यांनी कोठेही दगाफटका होणार नाही याची काळजी घेतली. शिवाय महायुतीच्या सर्व आमदारांशी समन्वय साधत एक संघर्ष पूर्ण विजय खेचून आणला होता. या लोकसभेच्या विजयानंतर उदयनराजे भोसले यांनी मतदारसंघात संपर्क नसणे ही तक्रार खोडून काढत पहिल्या दिवसापासूनच मतदार संघात भिंगरी सुरू केली होती. सातारा जिल्ह्यातील माण वगळता महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी उदयनराजे यांनी जीवाचे रान केले. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, आमदारांची भेटून त्यांच्याशी संघटनात्मक बांधणीची चर्चा, त्याचबरोबर राजकीय संवाद, मंडल प्रमुखांच्या बैठकांना उपस्थिती, कोपरा सभांमध्ये सहभाग अशा विविध माध्यमातून उदयनराजे सातही मतदार संघात दिसत राहिले.
सातारा होम ग्राउंड असल्यामुळे सातार्यासह कराड उत्तर आणि कराड दक्षिण मध्ये उदयनराजे यांनी विशेष जोर लावला होता. कराड उत्तर आणि दक्षिणची सर्व रणनीती अप्रत्यक्षरित्या उदयनराजे यांनी हाताळत कराड दक्षिण मधून अतुल भोसले आणि कराड उत्तर मधून मनोज घोरपडे यांना निवडून आणले. या दोन्ही मतदारसंघांमध्ये दोन्ही उमेदवारांचे श्रेय आणि त्यांचे संघटन तितकेच महत्त्वाचे आहे. त्यातही उदयनराजे यांनी आपला सहभाग नोंदवत या दोन्ही मतदारसंघाचे पालकत्व आपल्याकडे घेतले होते. 2019 च्या एका जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे यांना महाराष्ट्राचे कॅप्टन असे संबोधले होते. सध्या तरी सातारा जिल्ह्याची कॅप्टनशिप उदयनराजे यांच्याकडे चालून आली आहे.
सातारा लोकसभेचा खासदार तसेच एक जेष्ठ राजकारणी म्हणून उदयनराजे यांना सातारा जिल्ह्यातील प्रश्नांची सोडवणूक करताना केंद्रस्थानी राहावे लागणार आहे. केंद्राच्या योजना जिल्ह्यात लागू करताना त्याचा आमदारांशी समन्वय ठेवण्याचे उत्तम कसब उदयनराजे यांनी साधले आहे. लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांच्या रणनीतीमुळे सातारा जिल्ह्यात महायुतीचा बालेकिल्ला होण्यामध्ये कोणतीही अडचण आली नाही. यंदा खासदार उदयनराजे भोसले यांची खासदारकीची चौथी टर्म आहे. यामध्ये उदयनराजे पहिल्यांदाच जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. यापूर्वी जिल्ह्याची धुरा राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि दिवंगत नेते लक्ष्मणराव पाटील यांनी सांभाळली होती. मात्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला असून त्यावर महायुतीचे लेबल लागले आहे. त्यामुळे उदयनराजे यांच्याकडे जिल्ह्याची धुरा आली असून जिल्ह्यातील अनेक विकास कामांची कामे मार्गी लावताना युतीच्या बालेकिल्ल्याला कुठे तडा जाणार नाही, याची काळजीही उदयनराजे यांना घ्यावी लागणार आहे.
ज्या पद्धतीने उदयनराजे यांनी विधानसभा निवडणूक हाताळली, त्याच पद्धतीने आगामी सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि जिल्ह्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्येही उदयनराजे यांचा सहभाग तितकाच धडाडीने राहणार आहे. उदयनराजे भोसले हे महाराष्ट्रातले कसबी आणि धुरंदर नेतृत्व आहे. त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल जिल्ह्याच्या राजकारणाची नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातली आयकॉन आहे. त्यामुळे उत्तरोत्तर उदयनराजे भोसले यांचे प्रगल्भ होत जाणारे राजकारण पाहून राजे प्रेमी सुद्धा सुखावले आहेत.