कंत्राटी कामगारांचे खा.उदयनराजेंना साकडे

by Team Satara Today | published on : 17 July 2025


सातारा : एमएसईबीमध्ये नोकर भरती प्रक्रिया राबवताना कंत्राटी कामगारांना काढून टाकले जावू नये. कंत्राटी कामगार गेल्या 10 वर्षांपासून कमी पगारात काम करत आहेत. अशावेळी त्यांना काढले गेले तर अन्याय होईल. याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा व खा.उदयनराजे यांनी कंत्राटी कामगारांच्या पाठीशी रहावे, अशी मागणी करत कंत्राटी कामगारांनी त्यांना साकडे घातले.

सातारा जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांनी खा.उदयनराजे भोसले यांची गुरुवारी सातार्‍यात भेट घेवून मागणी केली. कंत्राटी कामगारांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, नवीन मुले भरती करा जुन्या आऊटसोर्स मुलांना कमी करा, असे धोरण सरकार राबवत आहे. महापारेषण कंपनी मधील कंत्राटी मुले 8 ते 10 वर्षे तोटक्या पगारात कंपनीची अहोरात्र सेवा करत आहेत. कोरोना काळात जीवाची काळजी न करता त्यांनी काम केले आहे. जेव्हा डिपार्टमेंटल स्टाफने त्यांच्या मागण्यासाठी बेमुदत संप केला होता तेव्हा कंत्राटी कामगारांनीच पूर्ण पारेषण सिस्टम अखंड सुरु ठेवली होती. ज्या ठिकाणी नामांकित एजन्सी काम करू शकली नाही तिथे कंत्राटी कामगारांनी ते काम अल्प वेळेत पूर्ण करून दाखवले आहे.

महापारेषणच्या काही वाहिनी घनदाट जंगलातून जातात कंत्राटी मुलांनी अहोरात्र काम केले आहे. गेल्या पाच वर्षामध्ये कंत्राटी कामगारांनी दिलेल्या सेवेमुळे होणार्‍या तांत्रिक बिघाडात तब्बल 70 ते 80 टक्के घट झाली आहे. या सगळ्यांचा विचार करता कंत्राटी कामगारांनी दिलेल्या या बहुमूल्य योगदानाची दखल सरकारने घ्यावी. यामुळे आम्हाला कामावरून काढून टाकू नये. आमचे कुटुंब आज त्याच्यावर चालत आहे. सरकारने याबाबत चुकीचा निर्णय घेतल्यास आम्हाला आंदोलन छेडावे लागणार आहे. यावेळी सातारा जिल्ह्यातील कंत्राटी कामगार उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आरोग्यदायी जीवनासाठी कचरा वर्गीकरण करा
पुढील बातमी
खासदार उदयनराजे यांच्या नावाने चक्क अभिनेते आमिर खान ला फोन

संबंधित बातम्या