कराड : कराड-विटा मार्गावरील कृष्णा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला युवक आणि शिक्षकाच्या प्रसंगावधानाने वाचविण्यात यश आले. संबंधित महिला पाटण तालुक्यातील असून तिला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
कराड-विटा मार्गावरील कृष्णा नदीवरील पुलावर सातत्याने वर्दळ असते. दोन दिवसांपूर्वी दुपारी कडक उन्हामुळे पुलावर वर्दळ कमी होती. दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास एक महिला कृष्णा पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या तयारीत होती. त्यावेळी कऱ्हाडातील राजू बोडरे हे शिक्षक कृष्णा कॅनाॅलवरून कऱ्हाडकडे येत होते. त्याचबरोबर शुक्रवार पेठेतील युवक रतीश शेलार हा त्याचदरम्यान पुलावरून कऱ्हाडकडे येत होता. संबंधित महिला पुलावरून उडी मारण्याच्या तयारीत असतानाच संबंधित दोघांनी त्या महिलेला धरून बाजूला घेतले.
त्यांनी त्या महिलेची विचारपूस करत तिला बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित महिला पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. अशातच वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक भोईटे हे कऱ्हाडवरून कृष्णा कॅनॉलकडे जाताना त्यांनी हा प्रकार पाहिल्यावर ते तेथेच थांबले. संबंधित महिलेची त्यांनी विचारपूस करून शहर पोलिस ठाण्यात त्याची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक भापकर यांनी शहर पोलिस ठाण्यातून कर्मचारी मोहसीन मोमीन यांना तेथे पाठवले.
मोहसिन मोमीन यांनी संबंधित महिलेला ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात नेले. संबंधित महिला साताऱ्यातील रहिवाशी असल्याने कराड पोलिस ठाण्यातून तिला पोलिस कर्मचाऱ्यांसमवेत सातारा पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले.