सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची कन्या राजकुमारी ऋणालीराजे व पृथ्वीराज देशमुख (रा. कडेपूर, सांगली) यांचे सुपुत्र रविराज यांचा विवाह सोहळा उद्या, दि. 4 रोजी सायंकाळी 5.21 वाजता शेंद्रे, ता. सातारा येथील अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनात होणार आहे. या सोहळ्याला राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि विविध क्षेत्रांमधील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात राहणार आहे.
छत्रपती घराण्याचे तेरावे वंशज, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजपचे पश्चिम महाराष्ट्रातील वजनदार नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि सौ. वेदांतिकाराजे या दाम्पत्याची कन्या ऋणालीराजे यांच्या विवाह सोहळ्याला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्य कृषी मूल्य आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, सहकार राज्यमंत्री बाबासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नगरपालिका निवडणुकांची धामधूम सांभाळत, शिवेंद्रसिंहराजे यांनी आपले पितृकर्तव्य या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पार पाडले. या विवाह सोहळ्यानिमित्त शुक्रवार पेठेतील शिवेंद्रसिंहराजे यांचे ‘सुरुची’ हे निवासस्थान आकर्षकरित्या सजवण्यात आले आहे. या विवाह सोहळ्याला राज्यातील नेतेमंडळी, कला, क्रीडा, सामाजिक आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रांसह समाजाच्या विविध स्तरातील मान्यवर उपस्थित राहणार असून, सातार्यात व्हीआयपींच्या मुक्कामाचा विशेष बंदोबस्त करण्यात आलेला आहे.
पाहुण्यांच्या स्वागतामध्ये स्वत: शिवेंद्रसिंहराजे यांनी लक्ष घातले आहे. हा विवाह सोहळा शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनामध्ये होणार आहे.
या विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका विविध मान्यवरांसह जनतेपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. तथापि, नजरचुकीने कोणाला निमंत्रण पत्रिका मिळाली नसेल, त्यांनी आपल्या घरचेच मंगल कार्य समजून, या सोहळ्याला अगत्यपूर्वक उपस्थित राहावे आणि वधू-वरास शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भोसले आणि ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.