कोरेगाव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज कक्ष सुरू; दिवाळीपूर्वी आर्थिक पूर्तीसाठाच्या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 12 October 2025


कोरेगाव :  दिवाळीमुळे कोरेगाव तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक गरज लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. समिती कार्यालयात नव्याने शेतमालतारण कर्ज कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती कल्याण भोसले, उपसभापती वैशाली भोसले व सचिव संताजी यादव यांनी केले आहे.

बाजार समितीमार्फत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यात सद्यस्थितीमध्ये पणन हंगामातील पिकांची काढणी सुरू असून सोयाबीन, मुग, उडीद पिकांची आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी विक्री करू नये. शेतकऱ्यांनी शेतमालास जास्तीत जास्त दर मिळवण्यासाठी बाजार समिती आवारातील अथवा पेठेवरील अधिकृत व्यापाऱ्यांकडे शेतमाल विक्रीसाठी आणावा.

शेतमाल विक्री करत असताना संबंधित पेढीवरील वजन काटा, मोइश्‍चर मीटर प्रमाणित करण्यात आले असल्याची खात्री करावी. कोणत्याही अनधिकृत व्यापाऱ्याकडे खेडा पद्धतीने आपला शेतमाल खरेदी- विक्री करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. भविष्यात राज्य अथवा केंद्र शासनाकडून एखाद्या शेतमालासाठी विक्री पश्चात अनुदान योजना लागू झाल्यास त्यावेळी बाजार समिती आवारातील किंवा अधिकृत शेतमाल खरेदी-विक्रीची अधिकृत शेतकरी पट्टी असणे आवश्यक असते. तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याने शेतमाल खरेदी-विक्रीनंतर शेतकरी पट्टी मागून घ्यावी.

बाजार समितीतर्फे नव्याने शेतमाल तारण कर्ज कक्ष सुरू करण्यात आला आहे. तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांनी या योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करावे. समितीतर्फे मका, हळद, सोयाबीन, तूर, मुग, उडीद या शेतमालासाठी आधारभूत किमती दराच्या ७५ टक्के शेतमाल तारण कर्ज १८० दिवसांसाठी सहा टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीच्या भांडवलासाठी तसेच सणासुदीच्या कालावधीत या योजनेचा फायदा घ्यावा व समितीशी संपर्क करून शेतमालाला जास्तीत जास्त दर घेऊन नफा कमवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बाजार समिती कार्यक्षेत्रातील सर्व शेतमाल, भुसार, आले व्यापारी खरेदीदारानी व्यवसायाचे परवाने असल्याशिवाय अथवा २०२५- २६ साठी नूतनीकरण केल्याशिवाय अनधिकृत व्यवसाय केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अवैध लाकूड वाहतूकप्रकरणी पाच जण ताब्यात; वन विभागाच्या फिरत्या पथकाची दोन ठिकाणी कारवाई
पुढील बातमी
भाजप, आरएसएसकडून लाेकतंत्र संपवण्याचे काम; काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बी. एम. संदीप यांचा आरोप

संबंधित बातम्या