खंडाळा : पारगांव खंडाळा बसस्थानकात एस.टी बस सुरु करताच भरधाव वेगात थेट उपहारगृहाच्या बाजूला असणार्या झाडाला धडकून पाण्याच्या टाक्यांची भिंती पाडून झुडपात घुसली. यामध्ये चालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने बसस्थानकांत प्रवाशांमध्ये काही काळ भितीचे वातावरण पसरले. सुदैवाने शाळांना स्थानिक सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांची गर्दी बसस्थानकात नसल्याने जिवीत हानी टळली. यामुळे बसस्थानकात घडलेल्या घटनेमुळे पारगाव खंडाळा आगारात तांत्रिक बिघाड व नादुरुस्त एस टी बसेसचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या अपघातात चालक दत्तात्रय राऊत, राहुल रामचंद्र कुंभार (रा.भोगाव, ता. वाई), कमल बाळु कुंभार (रा. शिरवळ) व मेधा फडतरे (रा. पुणे) हे गंभीर जखमी झाले. खंडाळा आगाराच्या स्वारगेट - महाबळेश्वर बसचे चालक दत्तात्रय राऊत हे स्वारगेटहून खंडाळा आगारात आले. बस स्थानकात आल्यावर बस थांबली तेव्हा काही प्रवासी व वाहक खाली उतरले. बस फलाटाला लावण्यासाठी पुन्हा बस सुरु करताना गाडी दचके मारत होती. बस सुरु होताच अचानक वेगात बस पुढे जात असताना चालकाने प्रसंगावधान राखीत उपहारगृह व स्वच्छता गृहाच्या मधील मोकळ्या जागेत बस घातली.
यावेळी ती पत्र्याचे कंपाऊंड तोडून पाण्याच्या टाक्या असलेले भिंतीला धडकून अडकली. अपघात झाल्यानंतर आगार व्यवस्थापक बिसमिल्ला सय्यद, पवन वाघेला, पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
संबंधित बस आगारात आल्यानंतर प्रवासी बसजवळ पळत आले. मात्र, वाहन कल्पना भारमळ यांनी प्रवाशांना तात्काळ बाजूला केले. सुदैवाने प्रवाशांनी भरलेल्या या बसस्थानकात नशीब बलवत्तर की एसटी बसखाली प्रवासी आले नाहीत. अपघात घडलेल्या ठिकाणी खंडाळ्यातील महाविद्यालय , ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी नेहमी घोळक्याने थांबलेले असतात. याच ठिकाणी पुरुष व महिलांसाठी स्वच्छता गृहे आहेत. सुदैवाने त्या ठिकाणी कोणीही प्रवासी नसल्याने मोठी हानी टळली.