मराठी साहसवीरांची थरारक चढाई

माउंट युनम हिमशिखर केले सर

by Team Satara Today | published on : 02 July 2025


मसूर : कोणेगाव येथील मानसिंह चव्हाण या गिर्यारोहकाने हिमाचल प्रदेशातील लहौल जिल्ह्यातील सहा हजार १११ मीटर उंच माउंट युनम या हिमशिखराची यशस्वीरीत्या चढाई केली. देशभरातून ३० अनुभवी गिर्यारोहक या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यापैकी सात जण शिखर माथ्यावर पोहोचले. त्यात कोणेगावच्या मानसिंह चव्हाणांसह पुण्यातील सहकारी कृष्णा मरगळे, अनंता कोकरे या मराठमोळ्यांचा समावेश आहे. या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे गिर्यारोहक मोहिमेची तयारी करत होते.

जवळपास उणे सात तापमान असल्याने कडाक्याची थंडी आणि उंचीवर होणाऱ्या सर्व शारीरिक बदलांना तेथे सामोरे जावे लागते. अनेक आव्हानांना तोंड देत हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करत मराठमोळ्या गिर्यारोहकांनी हे हिमशिखर पूर्ण केले.

शिखर माथ्यावर ऑक्सिजन पातळी कमी असल्याने या मोहिमेसाठी इच्छाशक्तीसोबत शारीरिक आणि मानसिक मजबुती महत्त्वाची होती. या उंचीवर २१ टक्क्यांऐवजी केवळ ९.५ टक्केच ऑक्सिजन आहे. त्यामुळे धाप लागते.

तेथील वातावरणात मिळते-जुळते होणे गरजेचे आहे. मनाली, केलाँग, भरतपूर असा एक-एक मुक्काम करत शिखराचा पायथा त्यांनी गाठला. रात्री दोनला ॲडव्हान्स बेस कॅम्पवरून मोहीम सुरू झाली. बर्फ वितळल्याने थंड पाण्यातून ओढा ओलांडून जावे लागले. सकाळी दहाला शिखर सर करण्यात गिर्यारोहकांना यश मिळाले. अचानक बदलणारे वातावरण, कधी बर्फवृष्टी, तर कधी घोंगावणारे वादळ अशा अनेक आव्हानांना तोंड देत पाठीवरील आवश्यक उपकरणे घेऊन ध्येयाच्या दिशेने एक-एक पाऊल टाकत जावं लागले.

अनेक गिर्यारोहकांना उंचीवर होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे मोहिमेतून माघार घ्यावी लागली. ऑक्सिजन कमी असल्याने हायपोक्सिया सारख्या त्रासाला सामोरे जावे लागल्याने उर्वरितांचे मनोबल चांगले राखणे आव्हानं असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नैसर्गिक आपत्तीसंदर्भातील पंचनामे पूर्ण होताच शासनाच्या धोरणानुसार मदतीचे वाटप : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव - पाटील
पुढील बातमी
शक्तिपीठ महामार्गावरील विरोधप्रकरणी खासदार विशाल पाटलांसह 50 जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या