सातारा : देशातील शिक्षणविषयक घडामोडींनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेच्या वतीने सातारा शहरातील पोवई नाका येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला तसेच लोकशाहीचा विजय असो, विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम आणि जनआंदोलनाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले की, शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर देशभरातील विद्यार्थी, युवक आणि सामाजिक संघटनांनी सातत्याने लोकशाही मार्गाने आवाज उठविला. या जनभावनेची दखल घेण्यास केंद्र सरकारला भाग पडले असून, हा निर्णय विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि लोकशाही पद्धतीने उभारलेल्या संघर्षाचा विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या विविध आंदोलनांमुळे शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले होते. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पारदर्शकता, शिक्षणातील सुधारणा आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी आंदोलन छेडले होते. त्यानंतर ’सीजेपी’च्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांनी परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी धरणे आंदोलन केले. या आंदोलनांना देशभरातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे सरकारवर नैतिक आणि लोकशाहीचा दबाव निर्माण झाल्याचे रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकार्यांनी नमूद केले.
पोवई नाका येथे झालेल्या आनंदोत्सवात कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष साजरा केला. आंदोलनकर्त्यांचा संघर्ष व्यर्थ गेला नसून लोकशाहीच्या चौकटीत उभारलेल्या जनआंदोलनाची ताकद पुन्हा अधोरेखित झाल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमास रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.