२९ धोम धरणग्रस्त गावांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय; २९ गावांतील ग्रामस्थांच्यावतीने मंत्री मकरंद पाटील यांचा सत्कार

by Team Satara Today | published on : 19 July 2026


सातारा : धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील (बॅकवॉटर) धरणाच्या वर सरकून वसलेल्या २९ धरणग्रस्त गावांना तब्बल १८ नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे हजारो धरणग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला असून, या भागाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा २९ गावांतील प्रतिनिधी व ग्रामस्थांच्या वतीने सातारा येथील त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.

हा ऐतिहासिक निर्णय १९७६ पूर्वीच्या धरणग्रस्त पुनर्वसन वसाहतींना दिलेल्या सुविधांच्या धर्तीवर घेण्यात आला आहे. ​या शासन निर्णयानुसार धरणग्रस्त गावांमध्ये ​रस्ते आणि अंतर्गत रस्ते,​ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व सार्वजनिक विहीर अथवा जलस्रोत, ​वीजपुरवठा व पथदिवे,​ शाळा आणि अंगणवाडी,​प्राथमिक आरोग्य सुविधा,​ समाजमंदिर आणि स्मशानभूमी,​ गटारे व जलनिस्सारण व्यवस्था, ​सार्वजनिक स्वच्छतागृहे,​ ग्रामपंचायत कार्यालय व खेळाचे मैदान,​ सार्वजनिक जागेचा विकास,​ वृक्षारोपण व पर्यावरणीय सुविधा तसेच इतर आवश्यक मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ​

या सत्कार सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे, पंचायत समितीचे सभापती भय्या डोंगरे, माजी सभापती चंद्रकांत शेलार दिलीप वाडकर, महेश पुजारी, नाना चिकने ब्रम्हदेव वाडकर यांच्यासह २९ गावांतील विविध संस्थांचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. या निर्णयामुळे धोम धरणग्रस्त भागात आनंदाचे वातावरण आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावर माचुतर गावाच्या हद्दीत एसटी-दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
पुढील बातमी
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला श्रीरामनगरीचा भक्तिमय निरोप; फुलांच्या वर्षावात माऊलींचा रथ पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ

संबंधित बातम्या