सातारा : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज मिळावी, या हेतूने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविण्यात येत आहे. या योजनेतून सातारा जिल्ह्यातील तांबवे ता.कराड या 4 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांचे व 11 केव्ही बे लाईनचे उद्घाटन मा.संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या हस्ते झाले. या सौरप्रकल्पांमुळे परिसरातील 1100 शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे.
याप्रसंगी अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर, कराडचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, उपविभागीय अभियंता स्वप्निल जाधव, शाखा अभियंता विशाल घुटूकडे, मेघा इंजिनिअरिंगचे व्यवस्थापक दयांनद दिवटे यांच्यासह महावितरणचे स्थानिक अधिकारी उपस्थित होते. यावेळी तांबवे उपकेंद्रात संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
नव्याने कार्यान्वित तांबवे सौर प्रकल्प 20 एकर जमिनीवर उभारण्यात आला असून 33/11 केव्ही तांबवे या उपकेंद्राशी जोडण्यात आलेला आहे. या उपकेंद्रावरील 10 गावातील 1100 कृषी ग्राहकांना दिवसा वीजपुरवठ्याची सोय झाली आहे. पोतवे, गमेवाडी, किरपे, आरेवाडी, दक्षिण तांबवे, उत्तर तांबवे, साजूर, डेळेवाडी, येणके, पठारवाडी या गावातील कृषी ग्राहक या सौर प्रकल्पामुळे लाभान्वित होणार आहेत.
संचालकांची वाई विभागीय कार्यालयास भेट
संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी वाई विभागीय कार्यालयास भेट देऊन स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी संचालक श्री. पवार यांनी वीजबिल थकबाकी वसूलीसह विविध योजनांची अंमलबजावणी, ग्राहकसेवा तसेच महावितरणच्या वाई विभागातील उपविभाग व शाखा कार्यालयाच्या पुर्नरचनेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता विशाल शिवतरे (वाई), अमित बारटक्के (सातारा) यांच्यासह स्थानिक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.