जिवंत देखाव्यांना रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी द्या!

by Team Satara Today | published on : 02 September 2025


सातारा : सातारा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समितीतर्फे आज जिल्हा पोलीसप्रमुख तुषार दोशी यांची भेट घेण्यात आली. यावेळी प्रथम पोलिसांनी गुन्हेगारी विरोधात केलेल्या धडाकेबाज कारवाईबद्दल समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर शाहुपूरी हद्दीतील सहा गणेशोत्सव मंडळांच्या जिवंत देखाव्यांना रात्री बारा वाजेपर्यंत सादर करण्याबाबत परवानगी देण्यात यावी, ही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समितीकडून मागणी करण्यात आली. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी याबाबत सकारात्मक विचार करु, असे आश्वासन दिले.

जिल्हा पोलीस प्रमुख यांना गणेशोत्सव समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहेे की, गणेशोत्सव मंडळाचे जिवंत देखावे रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. शहरातील अनेक मंडळे सामाजिक, ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवर भव्य जिवंत देखावे उभे करतात. नागरिकांची मोठी गर्दी यासाठी होत असल्याने, शेवटच्या पाच दिवसांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी, असे म्हटले आहे.

गणेशोत्सवामधील शेवटच्या दोन दिवसामध्ये राजवाडा चौपाटी ही रात्री 2 वाजेपर्यंत सुरू ठेवावी. गणेशोत्सवातील सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचा उत्साह नागरिकांना अधिक वेळ अनुभवता यावा यासाठी ही मागणी आहे. लाईटवरील निर्बंध उठवावेत, शार्पी लाईट आणि बीम लाईटवर घालण्यात आलेली बंदी उठवावी, अशी मागणी समितीकडून या निवेदनाद्वारे करण्यात आली. गणेशोत्सव मंडळांच्या वतीने नागरिकांच्या भावनांचा आदर राखत या मागण्या पोलीस प्रशासनापुढे मांडल्या गेल्या. समाजप्रबोधन, सामाजिक प्रश्नांवरील मांडणी तसेच पौराणिक व ऐतिहासिक वारसा दर्शविणारे देखावे हे गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य असल्याने त्यांना अधिक वेळ मिळावा, अशी समितीची भूमिका आहे.

निवेदन देताना गणेशोत्सव मंडळाच्या समितीमध्ये अक्षय गवळी, चंद्रशेखर घोडके, प्रविण पाटील, महेश साळुंखे, अभिजीत बारटक्के, सागर पावशे, पंकज चव्हाण, ऍड. गोकुळ सारडा, राहुल महामुने, अमित पवार, विक्रम यादव, सागर फल्ले आदी सहभागी झाले होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवतीर्थावर मराठा बांधवांचा जल्लोष
पुढील बातमी
सातारा शहरात मोबाईल चोरी करणारी परप्रांतीय टोळी जेरबंद

संबंधित बातम्या