सातारा : शाळेत सोडणार्या खासगी बस चालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली असून याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नितीन राजाराम पवार (वय 28, रा.पाटखळ माथा ता.सातारा) व पुष्कर कांबळे (रा.सदरबझार, सातारा) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, नितीन पवार याची खासगी बस असून तो दररोज मुला-मुलींना शाळेत बसने सोडतो. पिडीत मुलगी अल्पवयीन आहे, हे माहित असतानाही त्याने मुलीशी ओळख वाढवली व संपर्क करु लागला. यानंतर त्याने ऑक्टोबर महिन्यात मित्र असलेल्या पुष्कर कांबळे याच्या सदरबझार येथील घरात मुलीला नेले. तेथे नितीन पवार याने मुलीवर अत्याचार केले. या सर्व घटनेने मुलगी घाबरली. तसेच संशयिताने मुलीसोबत फोटो काढले. यामुळे पिडीत मुलगी अधिकच घाबरली व तिने कोणाला याबाबतची माहिती दिली नाही.
या सर्व घटनेनंतर पिडीत मुलगी घरात अबोल राहू लागली व घाबरल्यासारखी राहू लागली. यामुळे आईला शंका आल्याने तिने मुलीला बोलते केले असता मुलीने घडलेल्या घटनेची माहिती दिली. मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोनि राजेंद्र मस्के, पोलीस श्री देशमुख, राहूल घाडगे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले. महिला पोलीस अधिकारी व महिला पोलिसांनी मुलीकडून सर्व माहिती घेतली व दोघांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींची माहिती घेतल्यानंतर त्यांना रात्री उशीरा ताब्यात घेवून त्या दोघांना अटक करण्यात आली आहे.