सातारा : वडिलांकडून चारचाकी गाडीसाठी पाच लाख रुपये घेवून ये, असे सांगत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्यात पत्नी सरोज चेतन भोसले (वय 30, रा. भवानी पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. पती चेतन नारायण भोसले (वय 34), सासरे नारायण बापूराव भोसले, सासू रेखा नारायण भोसले (सर्व रा. गुरुवार पेठ, सातारा), नणंद शलाका रितेश जगदाळे, नंदावा रितेश चंद्रकांत जगदाळे (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा), लग्न जमावणारे शिंदे काका (पूर्ण नाव माहिती नाही, रा. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीत नमूद केले आहे की, दि. 11 नोव्हेंबर 2024 रोजी रामाचा गोट येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात हिंदू धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे पती चेतन याच्याशी लग्न केले. फिर्यादी व त्यांच्या आईवडिल, नातेवाईकांची जाणीवपूर्वक फसवणूक करत लग्नात सुमारे 8 लाख रुपये खर्च करण्यास भाग पाडले.
पती चेतन हा फिर्यादीला धमकावून पैशांची मागणी करत होता. तसेच क्रुरतेची वागणूक देत शारीरिक व मानसिक छळ करत होते. सहायक पोलीस निरीक्षक केणेकर तपास करत आहेत.