सातारा : धोम वाई खून खटल्यात माफीची साक्षीदार असलेल्या ज्योती मांढरेने गर्भवती असल्याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होती. यावर सरकार पक्षाने जामीन देण्यास हरकत नसल्याचे न्यायालयास सांगितल्याने संशयित आरोपी संतोष पोळ याने हरकत घेतली. त्याने ज्योती मांढरेवर अनेक आरोप केले.
या खटल्याची सुनावणी वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मेहेरे यांच्यासमोर सुरू आहे. मागील सुनावणीच्या वेळी ज्योती मांढरेच्या जामीनाची मुदत संपल्याने तिने न्यायालयासमोर शरणागती पत्करली होती. न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यान गर्भवती असल्याने स्वत:ची काळजी घेण्यासाठी जामीन मिळावा, असा अर्ज ज्योतीने न्यायालयात केला आहे. ज्योतीच्या जामीन अर्जावर सहाय्यक सरकारी वकील ऍड. मिलिंद ओक यांनी आपली बाजू मांडली. ज्योती मांढरे ही माफीची साक्षीदार असल्याने तिला जामीन देण्यास हरकत नसल्याचे म्हणणे त्यांनी न्यायालयास सादर केले. दरम्यान, मांढरेच्या जामीन अर्जाला संशयित आरोपी संतोष पोळ याने हरकत घेतली. स्वत: आपले म्हणणे मांडताना त्याने मागील जामिनाच्या कालावधीत मांढरेने जामीनाच्या अटी आणि शर्तीचा भंग केला आहे. पुराव्यामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आहे. कुमारी असताना ही गर्भवती राहू शकत नाही. जामीन मिळविण्यासाठी वेगळे कारण ती न्यायालयास सांगत असल्याचे त्यांने सांगितले. अनेक आरोप करत तिला दुसर्यांदा जामीन देण्यात येऊ नये, असे त्याने न्यायालयाला सांगितले.
यावर सरकारी वकील मिलिंद ओक यांनी ज्योती माफीची साक्षीदार आहे. तिला जामीन देण्यात यावा असे सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे असल्याचे सांगितले. मागील जामिनाच्या कालावधीत तिने पुरावे, अटी आणि शर्तींमध्ये कोणताही भंग केलेला नाही. पोळ वेगवेगळी कारणे सांगत या खटल्याची सुनावणी लांबवत आहे. एवढ्या दिवस माफीच्या साक्षीदाराला तुरुंगात ठेवता येणार नाही. तिच्या संरक्षणाची जबाबदारी सरकार घेईल. त्यामुळे तिला जामीन देण्यात यावा, असे ओक यांनी न्यायालयाला सांगितले.
ज्योती मांढरेच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय होणार
पोळचे आरोप मांढरेचे वकील विक्रम काकडे यांनी फेटाळले व जामीनाची मागणी केली. पोळच्यावतीने ऍड. ऋषिकेश सकुंडे यांनी काम पाहिले. मांढरेच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय होणार आहे. संतोष पोळ याला न्यायालयात आणण्यात आल्याने न्यायालयाच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.