सातारा : येथील अजंठा चौकातील हॉटेल फर्न समोरील महामार्गावरील उड्डाणपूल संपल्यानंतर अनधिकृतपणे शिक्कामोर्तब झालेला प्रवाशांचा 'तो' थांबा 'डेंजर झोन' ठरू लागला असून 'तो' थांबा बंद करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पुढाकार घ्यावा, अशी मागणी सातारकर नागरिकांमधून होऊ लागली आहे.
पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील शेंद्रे ते वाढे फाटा दरम्यान चार उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. हे चारही उड्डाणपूल तीव्र उतारावर आहेत. या महामार्गावरून १२० पेक्षा अधिक वेगाने वाहनांची ये-जा सुरू असते. अजंठा चौक परिसरात उड्डाणपूल संपल्यानंतर हॉटेल फर्नसमोर एक अनाधिकृत 'थांबा' उदयाला यायला लागला आहे. सातारा येथून खंडाळा, शिरवळ, पुणे आणि मुंबईकडे खासगी वाहनाने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत या थांब्यावर प्रवाशांची फार मोठी गर्दी असते. कोल्हापूर दिशेने येणाऱ्या वाहनांचा वेग अतिशय असून उड्डाणपूल संपल्यानंतर लगेचच हा थांबा असल्यामुळे अनेक खासगी वाहन चालक वेगावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत या थांब्यावर वाहन थांबवण्याचा प्रयत्न करतात. चार दिवसांपूर्वीच पुणे येथील नवले ब्रिजवर झालेल्या अपघाताने संपूर्ण महराष्ट्र हादरला होता. या अपघातात तब्बल ८ जणांचा मृत्यू तर २० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या अपघाताची पुनरावृत्ती सातारा येथील अजंठा चौक परिसरातील हॉटेल फर्नसमोर असलेल्या संबंधित अनधिकृत थांब्यावर होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तो अनधिकृत थांबा प्रशासनाने तात्काळ बंद करून भविष्यात होणारा संभाव्य अपघाताचा धोका टाळावा, अशी मागणी समस्त सातारकरांमधून होऊ लागली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा पोलीसप्रमुख तुम्ही सुद्धा लक्ष घालाच...
पुणे-बंगळूरू हा राष्ट्रीय महामार्ग महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यारीत येत असून मिळालेल्या माहितीनुसार या थांब्याला प्राधिकरणाने कोणतीही अधिकृत परवानगी दिली नाही. मृत्यूचा सापळा बनू पाहणारा हा अनधिकृत थांबा बंद करण्यासाठी राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह सातारा जिल्ह्याचे पोलीसप्रमुख तुषार दोशी तसेच महामार्ग पोलिसांनी यामध्ये लक्ष घालण्याची मागणीही सातारकर नागरिकांमधून होत आहे. वेळीच हा थांबा बंद नाही केला तर फार मोठ्या प्रमाणात अनर्थ होऊ शकतो. एखादी घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा ती घटना घडणारच नाही, यासाठी तात्काळ पावले उचला, अशी आर्त सादही सातारा शहरातील विविध संघटनांनी प्रशासनाला घातली आहे.
...तर ती कृती रोहित कदम याला खरी श्ठरद्रेधांजली ठरेल !
गुरुवारी सायंकाळी पुणे येथील नवले पुलावर झालेल्या अपघातात लोणी, ता. खंडाळा येथील रोहित ज्ञानेश्वर कदम, (वय २७) या वाहन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रोहितचे वडील ज्ञानेश्वर कदम हे हातावर पोट असणारे लघु व्यवसायिक असून त्यांनी नुकतेच कर्ज घेऊन घराचे बांधकाम केले होते. अशातच घरातील कमवत्या रोहितचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे त्या कुटुंबाचा आधारवड हरपला आहे. नवले पुलावरील अपघाताची पुनरावृत्ती 'त्या' अनधिकृत थांब्यावर होणार नाही, या दृष्टीने संबंधित विभागांनी तात्काळ पावले उचलल्यास ही कृती रोहित कदम याला आदरांजली ठरेल, अशा बोलक्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.