सातारा : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या तयारीसाठी सातारा पालिकेने अतिक्रमणांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. छत्रपती शाहू महाराज चौक ते बगाडे हॉस्पिटल या मार्गावरील टपऱ्या हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.
रविवारी सकाळी पार पडलेल्या या मोहिमेत अतिक्रमण विभागाने सुमारे आठ ते दहा टपऱ्यांवर कारवाई केली. अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली १५ कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरात काही काळ गडबड उडाली.
१४ एप्रिल रोजी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः भिमाई स्मारक समितीच्या वतीने होणाऱ्या ‘भिमाई महोत्सवा’च्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्ते मोकळे ठेवण्यावर प्रशासनाचा भर आहे.
नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या सूचनेनुसार आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. वाहतुकीची कोंडी टाळणे, अपघातांचा धोका कमी करणे आणि पादचाऱ्यांना मोकळा पदपथ उपलब्ध करून देणे, हा या कारवाईमागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि पदपथ अतिक्रमणांच्या विळख्यात अडकत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आगामी काळातही अतिक्रमण हटाव मोहिमा अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले.