उपासक-उपासिकांनी पारमिता पाळून धम्म आचरणाने सदाचारी जीवन जगावे : भदंत कश्यप

by Team Satara Today | published on : 19 August 2025


फलटण : तथागत भगवान बुद्धांनी स्वतःला कधीही बौद्ध धम्माचा संस्थापक, निर्माता किंवा अध्यक्ष असे संबोधले नाही.ते धम्माचे शास्ता  म्हणूनच म्हणजे शिक्षक", "मार्गदर्शक", या "धम्मोपदेशक"म्हणून राहिले आहेत. उपासक-उपासकांनी पारमिता पाळून धम्म आचरणाने या वर्षावास काळामध्ये सदाचारी जीवन जगावे असे प्रतिपादन भदंत कश्यप यांनी वर्षावास कार्यक्रमानिमित्त भारतीय बौद्ध महासभा तालुका फलटण शाखेच्या वतीने वाठार निंबाळकर येथे आयोजित धम्म प्रवचन मालिकेमध्ये धम्मदेसना देताना व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, आपल्याला धम्मातील,'स्कंध' म्हणजे 'समूह' किंवा 'गट' ही संकल्पना सांगितली आहे. पाच स्कंध आहेत त्यालाच पंचस्कंध म्हटले जाते. जे भौतिक आणि मानसिक घटकांचे समूह आहेत, आणि ज्यांच्यामुळे आपल्याला 'मी' किंवा 'माझे' असल्याची भावना येते. त्यामध्ये पाच स्कंध (पंचस्कंध) रूपस्कंध हे पहिले  स्कंध आहे. यात आपले शरीर आणि बाह्य जगाचा अनुभव घेणारे इंद्रिय घटक येतात. दुसरे स्कंध आहे वेदनास्कंध. यात सुख, दुःख आणि तटस्थ अशा भावनांचा अनुभव येतो. तिसरे स्कंध आहे संज्ञास्कंध. यात वस्तू आणि घटनांची जाणीव आणि ओळख यांचा समावेश होतो. चौथे स्कंध संस्कारस्कंध. यात आपल्या सवयी, विचार आणि इच्छा यांचा समावेश होतो. पाचवे स्कंध विज्ञानस्कंध. यात इंद्रियांनी मिळवलेल्या ज्ञानावर प्रक्रिया करून त्याला अर्थ देण्याचे कार्य होते. 

बौद्ध धम्मात दहा पारमिता आहेत. या दहा पारमितांना 'दशपारमिता' असेही म्हणतात. या दहा पारमिता म्हणजे दान, शील, नैष्क्रम्य, प्रज्ञा, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री आणि उपेक्षा. या दहा गुणांचा विकास करून बोधिसत्व होऊन कोणीही निर्वाण (मुक्ती) प्राप्त करू शकतो, त्यामुळे उपासकांनी दस पारमिता चे  पालन केले पाहिजे. दान पारमिता यामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता दान करणे. शील पारमिता यामध्ये नैतिक आचरण, चांगले बोलणे आणि वागणे. नैष्क्रम्य पारमिता यात सांसारिक इच्छांचा त्याग करणे. प्रज्ञा पारमिता यामध्ये ज्ञान आणि समजूतदारपणा येतो. वीर्य पारमिता यामध्ये उत्साह आणि चिकाटी येते. शांती पारमिता यामध्ये सहनशीलता आणि क्षमाशीलता येते. सत्य पारमिता यात सत्य बोलणे आणि प्रामाणिक असणे हे येते. अधिष्ठान पारमिता यामध्ये दृढनिश्चय आणि निर्धार हा भाग येते. मैत्री पारमिता यामध्ये सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करणे याचा अंतर्भाव होतो. उपेक्षा पारमिता यामध्ये समतोल आणि सहजीवन याचा अंतर्भाव होतो. जगभरातील कोणत्याही धर्माच्या अनुयायांनी या दस पारमिता पाळून धम्माच्या निती-नियमांवर आधारित जीवन जगून बुद्ध मार्गावरचा प्रवास कोणीही व्यक्ती साधू शकते. एवढेच स्वातंत्र्य तथागत भगवान गौतम बुद्ध आणि आपल्याला दिले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला हा विज्ञानवादी धम्म आपल्या आचरणातून आपण भारत बुद्धमय करण्यासाठी कटिबद्ध असलं पाहिजे.

त्रिसरण पंचशील, आर्यअष्टांगिक मार्ग, दस पारमिता आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला दिलेल्या 22 धम्म प्रतिज्ञा हीच बौद्धांची खरी आचारसंहिता आहे. ती सर्वांनी पाळल्याशिवाय भारत बुद्धमय करण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प पूर्णत्वास जाणार नाही.

या सोबतच काही रोग धम्मामध्ये सांगितले आहेत. मन, चित्त, कुशल कर्म -  भूक, झोप, आळस, व्यर्थ बडबड करणे याचेही भान सर्व उपासक उपासिकांनी ठेवलं पाहिजे.

कामवासना, द्वेष, आळस, चंचलता आणि संशय या पाच रोगांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. जर आपल्याला सुख पारमिता आपण आत्मसात करून सदाचारी जीवन जगण्यासाठी धम्माचा आचरण करून धम्म प्रचार आणि प्रसारासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या प्रचारकांना, बौध्द धम्म गुरूंना मदत करुन धम्म पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

यावेळी धम्मगुरु भंते कश्यप(परभणी)यांनी उपासक उपासिका यांना त्रिशरण पंचशील दिले. या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव, महासचिव बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, प्रचार आणि पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, तालुका संघटक विजयकुमार जगताप, संपत जयसिंग भोसले तालुका शाखा संरक्षण उपाध्यक्ष, धम्माचे प्रचारक व प्रसारक सोमीनाथ घोरपडे व वाठार निंबाळकर गावचे सर्व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश
पुढील बातमी
कोयनेचे सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले

संबंधित बातम्या