मुंबई : राज्यसभा खासदार आणि उद्धवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तुरुंगवासात असताना माझ्यावर विषप्रयोग झाला असण्याची शक्यता आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनीही आपल्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करून लवकरात लवकर टॉक्सिकॉजली टेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
या संदर्भात माहिती देताना संजय राऊत म्हणाले की सांगितले की, सुमारे १० दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये माझी राहुल गांधी यांच्यासोबत भेट झाली. यावेळी राहुल गांधी यांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. तेव्हा मी तुरुंगवासात असतानापासूनच माझी प्रकृती बिघडायला सुरुवात झाली होती, असे त्यांना सांगितले.
तेव्हा राहुल गांधी यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच तुरुंगवासादरम्यान कुठल्याही व्यक्तीची प्रकृती अशा प्रकारे बिघडणे चिंताजनक आहे, यामागच्या कारणांची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे, असे सांगितले. त्याबरोबरच शरीरामध्ये काही विषारी पदार्थ शिरले आहेत का याची तपासणी करण्यासाठी टॉक्सिक चाचणी करण्याचा सल्लाही राहुल गांधी यांनी मला दिला, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
संजय राऊत यांनी पुढे सांगितले की,समाज आणि जनहिताच्या मुद्द्यांवर संघर्ष करणाऱ्या लोकांसोबत ते तुरुंगात गेल्यानंतर कशाप्रकारचं वर्तन होतं, यावर प्रश्न उपस्थित झाले पाहिजेत. तुरुंगामध्ये काही लोकांच्या भोजनात विषारी पदार्थ मिसळला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर प्रकृती बिघडली आहे, असा मी काही एकटा माणूस नाही. काही इतर नेत्यांची प्रकृतीसुद्धा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बिघडली आहे. अशा प्रकरणांची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. राहुल गांधी यांच्याशी बोलल्यानंतर मी स्वत: लवकरच टॉक्सिक टेस्ट करून घेणार आहे. मात्र संजय राऊत यांनी केलेल्या या दाव्याला स्वतंत्रपणे दुजोरा मिळू शकलेला नाही.
तुरुंगात माझ्यावर विषप्रयोग झाला असावा; खासदार संजय राऊत यांचा सनसनाटी गौप्यस्फोट
by Team Satara Today | published on : 05 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा