सातारा : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे एका मुलाखतीत राष्ट्रवादीच्या एकीकरणाचा निर्णय पुढच्या पिढीने घ्यायचा आहे, असे सूचक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावर शुक्रवारी सातार्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी सावध पवित्रा घेतला. पवारांचे हे वक्तव्य कोणत्या संदर्भाने होते हे आधी तपासावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष असणार्या इंडिया आघाडीचा सत्ताधार्यांना देश म्हणून पूर्ण पाठिंबा आहे, असे त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे कर्मवीर पुण्यतिथी निमित्त सातार्यात आल्या होत्या. पुण्यतिथी कार्यक्रमाच्या नंतर त्यांनी काही काळ पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादीच्या एकीकरणासंदर्भात त्यांना छेडले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, केंद्र शासनाने इन्कमटॅक्स स्लॅबच्या संदर्भात नवीन विधेयक मांडले आहे. त्याच्या संदर्भात उच्चायुक्त समितीची दिल्ली येथे बैठक होती. त्या बैठकीनिमित्त मी दिवसभर दिल्ली येथे होते. ती बैठक आटोपून मी नुकतीच मुंबईवरून सातार्यात आले आहे. शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीच्या एकीकरण संदर्भात जे वक्तव्य केले आहे, त्याबाबतची मला अजिबात कल्पना नाही.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात जो निर्णय असेल तो सर्वांशी चर्चा करूनच घेतला जाईल. पवारांचे एकीकरणासंदर्भातले जे वक्तव्य आहे त्याचे संदर्भ तपासावे लागतील. कोणत्या हेतूने त्यांनी ते वाक्य उच्चारले आहे हे बघूनच त्याबाबतचे अधिकृत विधान करणे योग्य होईल, असे त्या म्हणाल्या. भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिल्ली येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सर्वांना देण्यात आली आहे. विरोधी पक्ष म्हणून इंडिया आघाडीच्या सर्व घटक सदस्यांना त्यांच्या जबाबदारीचे पूर्ण भान आहे. देश म्हणून आम्ही सर्व विरोधी गटातील घटक पक्ष देशाच्या हितासाठी केंद्र शासनाच्या बरोबर ठामपणे आहोत, असे त्यांनी सांगितले.