सातारा : सातारा जिल्ह्यात विविध विकास कामांच्या
संदर्भाने खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई
येथे नुकतीच भेट घेतली. या भेटीमध्ये सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या
संदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र
न्यायालय जिल्हा कारागृह व ईएसआयसी रुग्णालयाकरिता जागा उपलब्ध करणे या प्रमुख
मागण्यांसह विविध कामांची यादी सादर करण्यात आली.यासंदर्भात जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात
नमूद आहे की, लोक हिताला प्राधान्य देत छत्रपती शिवराय यांनी घालून दिलेल्या आदर्शवादी
तत्त्वावर चालणारे हे महायुतीचे सरकार आहे. सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे
आणि त्याचा पाठपुरावा नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला जातो.
त्या संदर्भाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली असता त्यांच्यापुढे काही
कामांची मागणी करण्यात आली. यामध्ये शिवस्वराज्य सर्किट विकसित करणे , पुणे
जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड तालुका करणे, कराड
येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर
न्यायालयांच्या नवीन इमारतीसाठी जागा उपलब्ध करणे, मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत सातारा लोहमार्ग
दूरक्षेत्राचे लोहमार्ग पोलीस ठाण्यात रूपांतर करणे, सातारा मध्यवर्ती आगारास नवीन बसेस उपलब्ध होणे, कास
पाणीपुरवठा योजनेवर आधारित एक किलोवॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प उभारण्यास
मान्यता मिळणे, क्षेत्र माहुली येथे नवीन कारागृह उभारणे संदर्भात जागा मिळणे, सातारा
शहरातील गुरांचा दवाखाना असलेली जागा नगर परिषदेला हस्तांतरित करणे, ईएसआयसी
रुग्णालय व कामगार भवन निर्माण करण्यासाठी सातारा एमआयडीसी येथील भूखंड हस्तांतरित
करणे, होलार समाज आर्थिक विकास महामंडळाला निधी उपलब्ध करून देणे ,इत्यादी
मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्या. या सर्व
शिफारशींचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्षपूर्वक अवलोकन करून विविध विभागांना
याबाबत सूचना दिल्या आहेत असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील विकास कामांची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे
खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट
by Team Satara Today | published on : 05 March 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा