सातारा : कोळकी, ता. फलटण येथील आर्यन शेर्या पवार यांना कुर्हाडीने गंभीर स्वरुपाची मारहाण करुन आणि घटनेनंतर स्वत:ची घरे स्वत:च जाळून इतर पारधी बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करणार्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सौ. नीलम रमेश पवार यांनी केली आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोमवार, दि. 23 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास किशोर उर्फ अभय छगन भोसले, राशा छबा भोसले, सुनिता राशा भोसले, सिता अभय भोसले, छगन पाखरु भोसले (सर्वजण रा. हणमंतनगर, ता. फलटण) यांनी आर्यन शेर्या पवार (रा. कोळकी) यांना कुर्हाडीने गंभीर स्वरुपाची मारहाण केली आहे. या घटनेत ते जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या घटनेनंतर मारहाण करणार्या लोकांनीच त्यांची स्वत:ची घरे स्वत: जाळून घेतली आणि इतर पारधी बांधवांवर खोटा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी किशोर उर्फ अभय छगन भोसले, राशा छबा भोसले, सुनिता राशा भोसले, सिता अभय भोसले, छगन पाखरु भोसले यांच्यावर कारवाई करावी. न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सौ. नीलम पवार यांच्यासह धीरज रमेश पवार, कोहिनूर रमेश पवार, रमेश फोरमन पवार, आर्यन शेर्या पवार यांनी निवेदनात दिला आहे.