सातारा : सातारा शहरातील तालुका पोलीस ठाण्याजवळ असलेल्या शिवतेज हॉलजवळ बुधवारी सकाळी 11 वाजता कारची महिला पादचारीला धडक बसल्याने त्यात ती ठार झाली. मृत महिला सातारा नगरपालिकेची कर्मचारी असून शहरातील वाढत्या अपघाताने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरस्वती नंदकुमार वायदंडे (वय 45, रा. गुरुवार पेठ, सातारा) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सरस्वती वायदंडे या पायी चाललेल्या होत्या. त्यावेळी कार क्रमांक एमएच 14 जीवाय 3547 या कारची महिलेला जोराची धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की, सरस्वती वायदंडे या गंभीर जखमी झाल्या व ओरडल्या. मात्र काही क्षणात त्या तेथे जागीच निपचित पडल्या.
वर्दळीच्या ठिकाणी कारची महिलेला धडक बसल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती शहर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी सातारा एसटी स्टॅन्ड परिसरात ट्रक व दुचाकीचा अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर लगेच सातार्यात अपघाताची घटना घडल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.