सातारा : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज ऐतिहासिक किल्ले प्रतापगडावर जात कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे सपत्नीक मनोभावे दर्शन घेऊन विधिवत पूजा व अभिषेक केला.
सालाबादप्रमाणे चालत आलेल्या परंपरेनुसार, छत्रपती घराण्याचे वंशज खा. उदयनराजे भोसले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनी आज किल्ले प्रतापगडावर भवानी मातेच्या मंदिरात उपस्थिती लावली. यावेळी पुरोहितांच्या वेदमंत्रोच्चारात आई भवानीचा अभिषेक व महापूजा शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न झाली. पूजेनंतर छत्रपती दांपत्याने आरती करून देवी चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.
या मंगल प्रसंगी बोलताना, महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट कायमचे दूर व्हावे, सर्वदूर समाधानकारक पर्जन्यवृष्टी होऊन धरणीमाता हिरवीगार व्हावी आणि राज्यातील बळीराजाच्या जीवनात सुख, समाधान व संपन्नता नांदावी, अशी मनोभावे प्रार्थना आई भवानीच्या चरणी केल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी सांगितले. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या प्रतापगडावर झालेल्या या पूजेदरम्यान परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. याप्रसंगी शिवप्रेमी, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा. उदयनराजे भोसले यांनी सपत्नीक घेतले प्रतापगडावरील भवानी मातेचे दर्शन; बळीराजाच्या समृद्धीसाठी घातले साकडे
by Team Satara Today | published on : 19 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा