सोन्याचे १५ तोळे दागिन्यांसह रोकड लंपास

पवारवाडीतील प्रकार

by Team Satara Today | published on : 22 August 2025


पाटण : घरातील वृद्ध व्यक्ती दरवाजा कुलूपबंद करून मंदिरात गेल्यावर चोरट्यांनी घराचा दरवाजा उचकटून सोन्याच्या १५ तोळे दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना पवारवाडी (कुठरे, ता. पाटण) येथे काल रात्री घडली. साडेसहा ते पावणेदहाच्या दरम्यान हा प्रकार झाला. येथील पोलिसात त्याची नोंद झाली आहे.

पोलिसांची माहिती अशी, पवारवाडी येथील दिनकर कृष्णा पवार (वय ७४) हे गावात पत्नीसमवेत राहतात. काही दिवसांपासून त्यांच्या पत्नी आजारी असल्याने कऱ्हाड येथील रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले आहे. पंधरा दिवसांपासून दिनकर पवार घरी एकटेच होते. काल सायंकाळी तेथील मंदिरात धार्मिक कार्यक्रमासाठी श्री. पवार घराच्या दरवाजाला कुलूप लावून साडेसहाच्या सुमारास मंदिरात गेले. तेथे धार्मिक कार्यक्रम, जेवण झाल्यानंतर रात्री पावणेदहाच्या सुमारास ते घरी परतले.

यावेळी घराच्या पाठीमागचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांना दिसले. घरातील साहित्यही अस्ताव्यस्त पडले होते. घरातील तिजोरी उचकटून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कमही लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना गोळा केले. ग्रामस्थ घटनास्थळी आले. सोन्याचे गंठण, लक्ष्मीहार, नेकलेस, सोनसाखळी, गणपतीचा फोटो असलेले सोन्याचे बदाम, सोन्याच्या चार बांगड्या, अंगठ्या, बुगड्या सोन्याचे ३० मणी आदी दागिने तसेच रोकड चोरट्यांनी लंपास केली.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी अंतिम प्रभागरचना प्रसिध्द
पुढील बातमी
कराडला कृष्णाबाई मंदिरात पाणी शिरल्यामुळे २१ कुटुंबांचे स्थलांतर

संबंधित बातम्या