धक्कादायक माहिती: पीएसआय बदनेने डॉक्टर तरुणीचे शोषण केल्याचेही त्याच्या चॅट्समधून स्पष्ट : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

by Team Satara Today | published on : 10 December 2025


नागपूर : फलटण येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणाच्या तपासासंदर्भात विधानसभेत प्रश्न विचारण्यात आले. आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक माहिती दिली. या प्रकरणात अटकेत असलेल्या पीएसआय बदनेने तरुणीचे शोषण केल्याचेही त्याच्या चॅट्समधून स्पष्ट झाले असल्याचे फडणवीसांनी विधानसभेत सांगितले.

भाजपचे आमदार अमित साटम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात फलटण डॉक्टर तरुणीच्या मृत्युप्रकरणी प्रश्न विचारला. 'गुन्हेगारी गुन्हे दाखल असलेल्या आरोपींच्या वैद्यकीय प्रमाणपत्रात फेरफार करण्याचा दबाव त्या डॉक्टरवर अटकेतील आरोपींपैकी एकाने टाकला असल्यामुळे, तिने आत्महत्या केली का? या प्रकरणातील एसआयटीचा तपास किती दिवसांमध्ये पूर्ण होणार?, असे प्रश्न साटम यांनी विचारले. त्याचबरोबर विजय वडेट्टीवार आणि इतर आमदारांनीही प्रश्न विचारले.

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. त्यातून समाजात दुःखाची लाट तयार झाली. याचा तपास करण्यासाठी एसआयटी समिती नेमली आहे. त्याचबरोबर न्यायालयीन चौकशीसाठी आयोगही नेमण्यात आला आहे. आतापर्यंतच्या तपासात न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) जो अहवाल आला आहे, त्यात डॉक्टर महिलेने हातावर जे लिहिलेलं आहे, ते तिचेच हस्ताक्षर आहे. दुसरा मुद्दा म्हणजे आरोपींनी दबाव आणला का? तर या सगळ्या प्रकरणात पोलीस अधिकारी बदने आहे. या बदनेची जी माहिती आपल्याकडे आलेली आहे. जे चॅट्स आलेले आहेत. त्यात तिची फसवणूक करून बदनेने तिचे शारीरिक शोषण केले असल्याचे लक्षात येत आहे. त्यातून लग्नाचे आमिष दाखवणे वगैरे गोष्टी लक्षात येतात. नंतर बदनेने वेगळी भूमिका घेतलेली दिसते. त्याने तिचे शोषण केल्याचे लक्षात येते, असे फडणवीस म्हणाले.  

ती वैद्यकीय अधिकारी होती. जेव्हा एखाद्या आरोपीला अटक होते, तेव्हा तो अटकेसाठी फीट आहे का, याबद्दलचे वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावे लागते. अशा प्रकारे काही रिपोर्ट त्या महिलेने अनफीट दिले. म्हणून पोलिसांनी एक मोठं पत्र त्यावेळी महिलेचे जे वरिष्ठ आहेत, त्यांना लिहिले की, अत्यंत महत्त्वाच्या गुन्ह्यातील हे गुन्हेगार असून, त्यांना अनफीट असल्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे. मग त्यावर चौकशी झाली. तिनेही पत्र दिले. पण ही सगळी बाब पाच महिने आधीची आहे, अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहाला दिली.

आता जी आत्महत्या दिसते, त्यात एकीकडे बदनेने केलेली फसवणूक आहे आणि दुसरीकडे त्या परिस्थितीचा फायदा घेऊन जो दुसरा आरोपी आहे, त्या आरोपीनेही एक प्रकारे फसवणूक केलेली आहे. म्हणून त्या दोघांचे नाव लिहून तिने आत्महत्या केली असे फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना सांगितले.  यामध्ये आतापर्यंतचे रिपोर्ट आलेले आहेत, त्यात दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. पहिली म्हणजे गळफास घेऊन मृत्यू झालेला आहे. दुसरे म्हणजे तिच्या हातावर जे लिहिलेले आहे, ते अक्षरे त्या महिलेचेच आहेत. आता याचे आरोपपत्र लवकरच दाखल होईल. अनेक गोष्टी समांतरपणे सांगितल्या गेल्या आहेत. त्याचीही न्यायालयीन चौकशी करतो आहोत आणि या प्रकरणाचा तपासही एका महिला आयपीएस अधिकारी करत आहेत", अशी माहिती फडणवीस यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
30 कोटींच्या फसवणुकीबद्दल विक्रम भटसह पत्नीला अटक; दोघांची पुढील चौकशी राजस्थानात सुरू
पुढील बातमी
भुरटे लोक पक्ष सोडून गेले : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; ऐरोलीमध्ये मशालीला घेऊन तुतारी वाजवा

संबंधित बातम्या