ग्रामपंचायत अधिकार्‍यांच्या सुरक्षेसाठी सातार्‍यात निदर्शने; ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेध, दोषींवर कठोर कारवाईची मागणी

by Team Satara Today | published on : 01 September 2026


सातारा : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने मंगळवारी (दि. 2) सातारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात जिल्ह्यातील मोठया संख्येने ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
शिवरे येथील घटनेमुळे राज्यभरातील ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीचे कामकाज करताना अधिकारी व कर्मचार्‍यांना अनेकदा दबाव, धमक्या तसेच हल्ल्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करून खुनाचा गुन्हा दाखल करावा, संबंधित प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, तसेच ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचार्‍यांना कामकाजादरम्यान आवश्यकतेनुसार पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामसभा बैठकींची संख्या मर्यादित करावी, ग्रामसभेदरम्यान अधिकारी व कर्मचार्‍यांचे अनधिकृत व्हिडिओ चित्रीकरण करून त्याचा सोशल मीडियावर विपर्यास अथवा बदनामी करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी स्पष्ट कायदेशीर तरतुदी कराव्यात, अशी मागणीही संघटनेने केली.
ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचार्‍यांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे, यासाठी शासनाने कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदन संबंधित प्रशासनाकडे सादर करण्यात आले. शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यात ‘डॉल्बी’ बंदच; ‘शांतता, शिस्त आणि सुरक्षितता’ या त्रिसूत्रीने गणेशोत्सव साजरा करा : निलेश तांबे यांचे आवाहन
पुढील बातमी
सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी; जनहक्क क्रांती मंचचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

संबंधित बातम्या