चाफळ परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; वन विभागाने उपाययोजना कराव्यात, ग्रामस्थांची मागणी

by Team Satara Today | published on : 26 April 2026


पाटण : चाफळ (ता. पाटण) येथील कुंभार खडी परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून एका शेतकऱ्याची शेळी ठार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी तातडीने वन विभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

चाफळ येथील कुंभारखडी परिसरात शेतकरी रामचंद्र ज्ञानदेव थोरात यांनी आपल्या घराच्या छपरात शेळ्या बांधून ठेवल्या होत्या. रात्रीच्या वेळी परिसरात शांतता असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक छपरात शिरून शेळीवर झडप घातली. बिबट्याच्या या हल्ल्यात शेळीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर बिबट्या अंधाराचा फायदा घेत पसार झाला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. रक्ताच्या खुणा आणि शेळीचा मृतदेह पाहून ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी आपल्या जनावरांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली असून रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास देखील भीती वाटत असल्याचे सांगितले.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी साळुंखे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला शासनाच्या नियमांनुसार नुकसान भरपाई मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, जनावरांना सुरक्षित व बंदिस्त ठिकाणी ठेवावे, रात्रीच्या वेळी एकटे फिरणे टाळावे आणि लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'बीव्हीजी'च्या १०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५,४६,०१० अपघातग्रस्तांना जीवनदान; नागरिकाला तातडीची व गुणवत्तापूर्ण सेवा देणे हे आमचे ध्येय - चेअरमन हणमंतराव गायकवाड
पुढील बातमी
पद्म पुरस्कार शिफारस समितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश

संबंधित बातम्या