संमेलन अध्यक्षपद स्वीकारणे ही वैचारिक आत्महत्या; संमेलनावर बहिष्कार घालावा

डॉ. भारत पाटणकर यांची 'पानिपतकार' विश्वास पाटील यांच्यावर टीका

by Team Satara Today | published on : 24 September 2025


सातारा  : साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विश्वास पाटील यांनी अध्यक्षपद स्वीकारणे ही त्यांची वैचारिक आत्महत्या आहे. या संमेलनावर जाती व्यवस्था नाकारणाऱ्या पुरोगामी विचारांच्या पिढीने बहिष्कार घालावा, असे आवाहन धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केले. 

येथील सुटाच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सातारा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याबाबत बहुजनांच्या परंपरेच्या वतीने बोलण्यासाठी अत्यंत चांगला दिवस आहे याचे कारण आजच्याच तारखेला 1873 सत्यशोधक समाज नावाच्या ऐतिहासिक क्रांतिकारी संस्थेची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या सहकार्याने केली. या व्यवस्थेने जात व्यवस्थेला नेहमीच माणुसकीच्या दृष्टिकोनातून नाकारले .विश्वास पाटील यांच्या साहित्यामधून शोषितांच्या दुःखांना नेहमीच स्थान मिळाले मात्र विश्वास पाटील आता प्रस्थापितांच्या व्यासपीठावर गेले आहेत त्यामुळेच त्यांचा उल्लेख आम्ही राजमान्य राजश्री करत आहोत.

99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद स्वीकारणे म्हणजे ही त्यांची वैचारिक आत्महत्या आहे,  अशी टीका त्यांनी केली.तसेच त्यांनी मला निम्न बुद्धीच्या आणि कमी दर्जांच्या माणसांच्या हाताखाली काम करावे लागते असे वक्तव्य त्यांनी करून आपल्या संकुचित विचारांचे दर्शन घडवले होते त्यांची ही वक्तव्य साहित्यिकांच्या रेकॉर्डवर सुद्धा आहेत. या वाक्याच्या माध्यमातून ते मनुवादी संस्कृतीचे समर्थन करतात असे होते.  त्यामुळे साताऱ्यातील पुरोगामी विचारांची परंपरा असणाऱ्या सर्व नागरिकांनी या संमेलनावर बहिष्कार घालावा, असे आवाहन त्यांनी केले. 

साताऱ्यामध्ये लवकरच विद्रोही साहित्य संमेलनाच्या वतीने श्रमिक वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे समांतर साहित्य संमेलन भरवले जाणार आहे हे संमेलन कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय लोकवर्गणीतून चालवले जाईल. या व्यासपीठावर शोषितांच्या दुःखांची मांडणी केली जाईल, असे भारत पाटणकर म्हणाले.  


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यात साडेसात हजार महिलांनी घेतला मोफत आरोग्य तपासणीचा लाभ
पुढील बातमी
पारंपरिक वाद्यांसाठी बारा वाजेपर्यंत परवानगी मिळावी

संबंधित बातम्या