मांढरदेव (जीवन मांढरे) : संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलाच्या भक्तीमध्ये दंगुन गेलेला असताना.विविध संतांच्या पालख्या पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे रवाना झालेल्या आहेत. त्यामध्ये लाखोंच्या संख्येने वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात 'माऊली, माऊली'च्या नाम घोषात भक्ती रसात दंग होऊन पंढरपूरकडे मजल दर-मजल करत विठ्ठल भेटीला जात आहेत. या सोहळ्यामध्ये वारकरी ऊन, वारा,पाऊस कशाचीही तमा न बाळगता.विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने आपले श्रद्धास्थान असलेल्या संताची पालखी घेऊन पंढरपूरकडे चालत आहोत.
अशा या भक्तीमय वातावरणाचा तसेच विठ्ठल भक्तीचा आनंद लहानशा चिमुकल्यांना पण घेता यावा. व त्यांना आपली संस्कृती समजावी.या उद्देशाने मांढरदेव येथील प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडी मार्फत चिमुकल्यांचा पायी दिंडी सोहळा उत्साहात आनंदात, भक्तिमय वातावरणात काढण्यात आला. सोहळ्यामध्ये अनेक चिमुकल्यांनी पौराणिक पोशाख परिधान करून हातात भगवी पताका,टाळ,मृदुंग,विना तसेच डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन आपला सहभाग नोंदविला. या दिंडी सोहळ्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका शाळा शिक्षण समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक, युवतींनी मोठ्या संख्येने आपला सहभागी नोंदविला.
या दिंडीची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून करून त्याची संपूर्ण गावातून नाचत, अभंग गात फेरी काढण्यात आली.या दिंडी सोहळ्यामुळे गावामध्ये भक्तीमय वातावरण तयार झाले होते.या उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या. तसेच या सोहळ्याचा पाहून आनंद घेणाऱ्या पालकांनी तसेच ग्रामस्थानी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकरी भक्तांना सूर्यकांत बाळासो मांढरे व माधुरी सूर्यकांत मांढरे यांच्या कडून प्रसादाचे(भोजनाचे) आयोजन करण्यात आले होते.