शेणोलीतील अंध प्रियांका बनली महसूल सहाय्यक

by Team Satara Today | published on : 17 July 2025


कराड : परिस्थिती आणि संकट एकत्र आलं, की त्यावर स्वार होऊन मात करणे, हा एकमेव मूलमंत्र घेऊन शेणोली (ता. कराड) येथील प्रियांका अविनाश जाधव या अंध युवतीने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाला गवसणी घातली. तिच्या जिद्दीच्या प्रवासात तिला नुकतेच महसूल सहाय्यक पदाच्या परीक्षेत यश मिळाले आहे. 

इयत्ता पाचवीत असताना प्रियांकाच्या डोळ्यातील अंधत्व वाढले. या संकटावर मात करताना तिने जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्यात उसंत न घेतल्यानेच तिने यशाला गवसणी घातली आहे. वडील अविनाश व आई सुजाता यांना प्रियांका आणि प्रसाद ही दोन मुले. वडील बजाज ऑटो कंपनीत नोकरीस असल्याने तिच्यासह भाऊ प्रसादचे सर्व शिक्षण पुण्यात झाले. प्रियांकाने थेरगाव (पुणे) येथील प्रेरणा हायस्कूल व लोकमान्य टिळक विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ती पाचवीत असताना तिच्या दृष्टीतील अंधत्व वाढत गेले आणि तिला पूर्णतः अंधत्व आले.

अशा परिस्थितीत आई- वडिलांनी तिचे शिक्षण सुरूच ठेवले. शाळेत शिकवलेले न विसरता ती लक्षात ठेवायची. शाळेतून घरी आल्यानंतर आई सुजाता या तिचे वाचन, लिखाणापर्यंतचा सर्व भार पेलायच्या. सहाय्यक लेखनिकाच्या मदतीने तिने सर्व वर्गांची परीक्षा दिली. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत तिला या कामात अडसर झाला. त्यावरही मात करत तिने प्रयत्न सोडले नाहीत. परीक्षा मंडळाने मान्य केलेल्या लेखनिकाच्या मदतीने तिने दहावी व बारावीची परीक्षा दिली. दहावीत चांगल्या गुणांनी, तर बारावीच्या परीक्षेत ती महाविद्यालयात प्रथम आली. पुणे येथील श्रीमती नातीबाई ठाकरसी महिला विद्यापीठातून तिने बीए (अर्थशास्त्र) पदवी घेतली. पदवीच्या तिसऱ्या वर्षात असताना नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय सेवेत दिव्यांगांना आरक्षण असल्याचे समजताच तिने पदवी पूर्ण करताच लोकसेवा व राज्यसेवेच्या परीक्षेची तयारी सुरू केली.

यावेळेस तिला परिस्थितीचा अडसर झाला; परंतु नातेवाईक, मित्र व मैत्रिणी व गावातील मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कणसे यांनी मदत केली. इस्लामपूर (जि. सांगली) येथील अभ्यासिकेत प्रवेश घेऊन तिने अभ्यास केला. तिथे मैत्रीण सरिता व तिचा भाऊ अभिजित निवास निकम या दोघांची साथ मिळाली. सरिता व अभिजितने तिचा अभ्यास घेण्यापासून लेखन कामापर्यंत तिच्यासाठी दिवसरात्र कष्ट घेतले.

प्रियांकाने आतापर्यंत राज्यसेवा व लोकसेवा आयोगाच्या शासकीय सेवेतील चार पदांसाठी परीक्षा दिल्या आहेत. कर सहाय्यक पदासाठी नुकतीच परीक्षा दिली आहे. महसूल सहाय्यक पदाच्या परीक्षेत नुकतीच ती यशस्वी झाली. तिच्या कुटुंबात आनंदाला उधाण आले. गुलालाची उधळण करत आनंदही व्यक्त केला. या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुर्गा पेठेतून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
दराअभावी टोमॅटोचे वाताहत

संबंधित बातम्या